31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरराजकारणपश्चिम बंगालमध्ये त्रिपुरा पार्ट-२ होणार का?

पश्चिम बंगालमध्ये त्रिपुरा पार्ट-२ होणार का?

Google News Follow

Related

एकूण ३५ वर्षे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असलेल्या त्रिपुरात २०१८ च्या निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ४४ जागा जिंकून राजकीय चमत्कारच केला. एकही आमदार नसलेला पक्ष सत्तेत आला.  कम्युनिस्टांचा अभेद्य गड पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. एप्रिल-मे २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये याची पुनरावृत्ती होईल काय अशी देशभरात चर्चा आहे.

प.बंगालमध्ये ३३ वर्षांचा कम्युनिस्टांचा एकछत्री अंमल संपुष्टात आणून २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या होत्या. त्रिपुरा आणि प.बंगाल ही दोन्ही बंगाली भाषकांचे बाहुल्य असलेली राज्य. दोन्ही राज्यांचे गणित जवळपास सारखे आहे.

पश्चिम बंगालची लोकसंख्या ७०% हून थोडी अधिक हिंदू तर २७%च्या आसपास मुसलमान आहे. अर्थात मुसलमानांची संख्या ही बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये एकवटलेली आहे. २९४ पैकी साधारणतः ७० विधानसभा मतदार संघ हे मुस्लिम बहुल आहेत.

८६% पेक्षा थोड्या जास्त बंगाली भाषिक पश्चिम बंगालमध्ये हिंदी व गोरखा मतदारांचा काही मतदारसंघात निश्चितच प्रभाव आहे. लगतच्या बिहार मधून मजुरी करण्यासाठी आलेला हिंदी भाषिक कष्टकरी वर्ग बिहारच्या आजच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपकडे वळेल अशी शक्यता जास्त आहे.

या मतदारांचा सर्वाधिक प्रभाव अर्थातच कोलकाता व आसपासच्या परिसरात आहे. याच मतदारसंघांमध्ये व्यापारी असलेला मारवाडी मतदारही एकवटलेला आहे. परंपरेने तोही भाजपचाच मतदार आहे.

पश्‍चिम बंगालच्या उत्तर भागात असलेल्या ५४ विधानसभा मतदारसंघांपैकी दार्जिलिंग आणि आसपासचा नेपाळी भाषिक गोरखा मतदार आज राजकीयदृष्ट्या कुंपणावर असला तरी तो केंद्र सरकारच्या बाजूला झुकलेला असतो असा आजवरचा अनुभव आहे. अर्थात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप दोघेही या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा कसोशीने प्रयत्न करतील हे उघड आहे.

प.बंगालमध्ये नगण्य असलेल्या भाजपाने अल्पावधीत काँग्रेस आणि कम्युनिष्टांना बाजूला सारून राज्यात नंबर दोनचे स्थान मिळवले. भाजपाच्या वाढत्या शक्तीची झलक २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने केलेल्या प्रचंड दडपशाहीनंतर देखील भाजपने ४२ पैकी १८ जागा जिंकल्या. घवघवीत यश मिळवले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची या विजयात महत्वाची भूमिका होती. शहा यांची रणनीती इथेही काम करते आहे. त्यांच्या रणनीतीचा देशभरातील विरोधकांनी प्रचंड धसका घेतला आहे. ममताही त्याला अपवाद नाहीत. विरोधकाला कोणत्याही पातळीवर जाऊन रोखण्याचा ममतांचा लौकीक आहे. अडवणुकीच्या कोलदांड्यामुळे भाजपाला तात्पुरते रोखण्यात ममतांना यश आले अन्यथा भाजपने २४-२५ जागांपर्यंत सहज मुसंडी मारली असती असा जाणकारांचा अंदाज आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतानाही त्रिपुराच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील हा विजय नेत्रदिपक असाच आहे. या १८ खासदारांना मिळालेल्या मतांचे बारकाईने विश्लेषण केल्यास २९४ पैकी साधारणतः १२२ विधानसभा मतदारसंघात भाजपने तृणमूलवर आघाडी घेतली आहे. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत असेच घडले होते. काँग्रेस बरोबरच्या युतीत १९ जागा जिंकून तृणमूलने प्रचंड मुसंडी मारली होती परंतु सत्तेच्या गुर्मीत असलेल्या मार्क्सवाद्यांना मतदारांचा इशारा कळला नाही. आज ममता सत्तेच्या त्याच धुंदीत आहे.

प.बंगालमध्ये मुस्लीम मतांचा टक्का लक्षणीय आहे. अल्पसंख्यकांच्या मतांशिवाय आपण जिंकू शकणार नाही अशी ठाम धारणा असलेल्या ममता दीदींनी मुस्लीम लांगूलचालनाचा कहर केला आहे. मदरशांच्या मौलवींना भरघोस वेतन देण्यापासून ते घुसखोर बांगलादेशी मुसलमानांसाठी NRC ला विरोध करण्यापर्यंत ममतांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. अनेक जिल्ह्यात घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वस्त्या झाल्या असून त्यांनी मतदार यादीत यशस्वीपणे घुसखोरी केली आहे. हे हक्काचे मतदार असल्यामुळे ममतांनी त्यांना वेळोवेळी सक्रीय पाठींबा दिलेला आहे. वेळप्रसंगी हिंदू समाजावर अन्याय करून, त्यांची मुस्कटदाबी करून प्रत्येक वेळी, प्रत्येक बाबतीत ममतांनी मुसलमानांना झुकते माप दिले आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मधला हिंदू स्वतःला एकाकी आणि अनाथ झाल्याचे अनुभवतो. भाजपा वगळता अन्य कोणताही राजकीय पक्ष हिंदूंच्या बाजूने उभा राहत नाही. वेळप्रसंगी मार खाऊन, पोलिसांचे अत्याचार सहन करून भाजपाचा कार्यकर्ता हिंदू समाजासोबत उभा आहे. त्याची किंमतही भाजपा कार्यकर्त्यांनी चुकवली आहे. आजवर अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. फाळणीच्या वेळी अनुभवलेल्या अत्याचारांच्या पीडादायक वेदनांना हिंदू समाज प.बंगालमध्ये पुन्हा सामोरा जातोय. अनेक जिल्हे मिनी पाकीस्तान बनले आहेत. हीच परीस्थिती हिंदूना संघटीत होण्यासाठी बाध्य करते आहे.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील पश्चिम बंगालच्या निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी ममतांना युती करण्याची ऑफरदेखील दिली आहे. सन्मानजनक जागा मिळाल्यास ही युती होईल अन्यथा आपण स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यास समर्थ आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे. मोहम्मद अली जिना यांच्या मुस्लिम लीगचा नवीन अवतार असलेल्या ओवेसी यांच्या MIM  ने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यास ममतांच्या मुस्लिम मतपेढीतला एक मोठा हिस्सा तिकडे जाण्याची शक्यता आहे. ज्याचा प्रचंड फटका ममतांच्या तृणमूलचा गड बनलेल्या मुस्लीमबहुल अशा ७० मतदार संघात बसेल. बिहारमध्ये पाच जागा जिंकून ओवेसींनी आपल्या उपद्रव क्षमतेची चुणूक दाखवलीच आहे.

त्रिपुरापेक्षा पश्चिम बंगालमध्ये भाजप समोर काही वेगळी आव्हाने आहेत. त्रिपुरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे वयोवृद्ध होते. राज्यात प्रचंड रक्तपात आणि गुंडागर्दी करणा-या माकपाचा शांत आणि संयमी मुखवटा होते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा आक्रमकपणा आक्रस्ताळेपणाकडे झुकणार आहे. मुख्यमंत्री असून देखील रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची, विरोधकांसोबत दोन हात करण्याची त्यांची तयारी आहे.

अशा नेतृत्वाला भाजपाला टक्कर द्यायची आहे. रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नेतृत्व पश्चिम बंगालच्या जनमानसाला भावते किंबहुना अशाच स्वभावामुळे ममतादीदी लोकप्रियतेच्या शिखरावर पोचल्या. कम्युनिस्टांच्या दादागिरी विरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करताना एकदा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला होता. ममतांना लंडनला नेण्यात आले व तिथे शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचवण्यात आला. मात्र या संघर्षामुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोचल्या. आज माकपाची गुंडगिरी सौम्य आणि शीतल वाटावी असे वातावरण ममता प.बंगालमध्ये निर्माण केले आहे. अमित शहा यांची रणनीती ही भाजपाची जमेची बाजू आहे.

त्रिपुरात भाजपने काँग्रेस, तृणमूल आणि सत्ताधारी मार्क्सवादी पक्षाच्या एखाद-दुसरा अपवाद सोडला तर सगळ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन सामावून घेतले होते. त्यामुळे त्रिपुरातील लढत ही भाजप व मित्र पक्षांची युती विरुद्ध मार्क्सवादी अशी सरळ दोन पक्षातच झाली. प.बंगालमध्येही तिच रणनीती वापरण्यात येत आहे. तृणमूलला सुरूंग लावण्याचे काम सुरू आहे. पक्ष आणि सरकारमध्ये सामील असलेले मोठे मासे गळाला लावण्याचे काम सुरू आहे.

डिसेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यात ममतांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिलेले क्रमांक दोनचे नेते व मंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलचे दोन खासदार, ८-१० आमदार, अनेक नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र त्याच कार्यक्रमात मार्क्सवादी पक्षाच्या दोन आमदारांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला या बातमीकडे फारसे कोणाचे लक्ष दिले नसावे. मात्र ही सुरुवात आहे. निवडणुकीपर्यंत सत्ताधारी तृणमूल बरोबरच काँग्रेस व मार्क्‍सवादी पक्षातील लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्याची भाजपची रणनीती राहील.

पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पूर्वतयारी व अनुकूल वातावरण निर्मितीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा स्वतः मैदानात उतरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वारंवार पश्‍चिम बंगालचा दौरा करत आहेत. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्या की त्या रणधुमाळीत नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फौज मैदानात उतरवल्याशिवाय भाजप राहणार नाही याची झलक फक्त त्रिपुरातच नव्हे तर आपल्याला तुलनेने दुय्यम वाटणाऱ्या हैदराबादच्या महानगरपालिका निवडणुकीत बघायला मिळाली आहे.

भगवी कफनी घातलेला योगीजींसारखा तरुण व तडफदार मुख्यमंत्री हिंदू मतदारांच्या हृदयाचा ठाव घेतो हा आजवरचा अनुभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले असून त्यांचेही लक्ष प.बंगालवर आहे. भाजपाच्या दृष्टीने जमेच्या बाजू अनेक आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममतांचा गड कोसळला तर देशातील विरोधी पक्षांसाठी तो मोठाच मानसिक धक्का असेल.

-लेखक पराग नेरूरकर

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा