तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी रविवारी दिल्लीमध्ये झालेल्या दुर्मिळ पत्रकार परिषदेत अफगाण महिलांच्या शिक्षण आणि कामावरील बंदीबाबत स्पष्टीकरण दिले. ही परिषद विशेष ठरली कारण ती महिला पत्रकारांच्या उपस्थितीत झाली.
मुत्ताकी, जे संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधाखालील वरिष्ठ तालिबान नेते आहेत, ते म्हणाले की, महिलांचे शिक्षण “हराम” (इस्लामविरोधी) नाही, परंतु ते “देशाच्या सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित” केले आहे.
महिलांवरील बंदीबाबत मुत्ताकीचे स्पष्टीकरण
मुत्ताकी म्हणाले, “सध्या आमच्याकडे १ कोटी विद्यार्थी शाळा आणि इतर शिक्षणसंस्थांमध्ये शिकत आहेत, त्यापैकी २.८० लाख महिला आणि मुली आहेत. धार्मिक मदरशांमध्येही त्यांना पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची संधी आहे. काही भागांमध्ये मर्यादा आहेत, पण याचा अर्थ आम्ही शिक्षणाच्या विरोधात नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, तालिबानने महिलांचे शिक्षण “धार्मिक दृष्ट्या हराम” ठरवलेले नाही, तर “फक्त पुढील आदेश येईपर्यंत स्थगित” केले आहे. मुत्ताकी यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तान सध्या शांततेचा अनुभव घेत आहे आणि “वेळेनुसार आवश्यक बदल केले जातील.”
हे ही वाचा:
धन धना धन धन…मंधाना! रचला इतिहास
खसखस: शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करणारे औषध
पंतप्रधान मोदी एनडीए कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
नेपाळच्या तुरुंगातून पळालेली पाकिस्तानची महिला त्रिपुरात
महिलांच्या हक्कांवरील जगभरातील टीका
अफगाणिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जिथे सरकारने महिलांच्या मूलभूत हक्कांवर संपूर्ण बंदी घातली आहे.
महिलांना सार्वजनिक उद्याने, बाजारपेठा, मशिदी, जिम, सलून आणि विद्यापीठांमध्ये जाण्यास मनाई आहे. २०२१ मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर तालिबानने महिलांच्या सार्वजनिक आयुष्यातील सहभागावर कठोर निर्बंध लादले आहेत. अनेकदा महिलांना विद्यापीठात प्रवेश नाकारण्यात आला, आणि आंदोलन करणाऱ्या महिलांवर चाबकाने मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, तालिबानच्या कठोर कारवाईमुळे अफगाण महिलांचे जीवन “श्वास रोखणाऱ्या” परिस्थितीत आले आहे.
पत्रकार परिषदेत महिलांची उपस्थिती
ही पत्रकार परिषद दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासात झाली, जिथे ५० पेक्षा अधिक पत्रकार उपस्थित होते.
परंतु, मुत्ताकी यांच्या वक्तव्यांवर पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारण्याची परवानगी नव्हती. हे आयोजन विशेषतः वादग्रस्त ठरले कारण याआधी शुक्रवारी दिल्लीतील एका कार्यक्रमातून महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता, ज्यामुळे मोठा विरोध उसळला.
मुत्ताकी यांनी रविवारी त्या घटनेबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले, “महिलापत्रकारांना वगळण्याचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे झाला. ती पत्रकार परिषद अल्पावधीत आयोजित करण्यात आली आणि ‘निवडक पत्रकारां’ची यादी मर्यादित होती.”







