शिमरॉन हेटमायरने टी20 वर्ल्ड कप २०२६ मधील दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी करत इतिहास रचला. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक करणारा कॅरेबियन फलंदाज होण्याचा मान त्याने पटकावला.
हेटमायरने ३६ चेंडूत ६ षटकार आणि २ चौकारांच्या जोरावर ६४ धावा केल्या. यामध्ये त्याने अवघ्या २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या कामगिरीसह त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. गेलने २००९ साली द ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
जागतिक स्तरावर पुरुषांच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत विक्रम केला होता. तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर असून, त्याने २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७ चेंडूत ही कामगिरी केली होती.
कोलकाता येथे सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजने ५ बाद १८२ धावांचा भक्कम स्कोअर उभारला. कर्णधार शाय होप आणि ब्रँडन किंग यांच्या सलामी जोडीने ८.२ षटकांत ५४ धावांची भागीदारी केली. शाय होपने २२ चेंडूत १९ धावा केल्या, तर ब्रँडन किंगने ३० चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांसह ३५ धावा केल्या.
५८ धावांपर्यंत वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर बाद झाले होते. त्यानंतर हेटमायरने रोवमॅन पॉवेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ८१ धावांची भागीदारी करत संघाला १३९ धावांपर्यंत मजल मारून दिली. पॉवेलने १४ चेंडूत २४ धावा केल्या. पुढे हेटमायरने शेरफेन रदरफोर्डसोबत चौथ्या विकेटसाठी ३६ धावा जोडत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले.
रदरफोर्डने ८ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली, तर १३ चेंडूत २६ धावा करून तो बाद झाला. स्कॉटलंडकडून ब्रॅड करीने सर्वाधिक २ बळी घेतले, तर सफयान शरीफ, ऑलिव्हर डेविडसन आणि मायकेल लिस्क यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेटमायरच्या या तुफानी खेळीमुळे वेस्ट इंडिजला भक्कम धावसंख्या उभारता आली आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये आणखी एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला.







