भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज विराट कोहली याची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नसून जगभरात त्याचा दबदबा आहे. याचीच प्रचिती ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्या वक्तव्यातून आली. मार्ल्स यांनी विराट कोहलीचे कौतुक करत “सध्या कोहली हे ऑस्ट्रेलियातील एक मोठे नाव आहे” असे म्हटले आहे.
‘मनोबल’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रिचर्ड मार्ल्स यांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंध, क्रिकेट आणि दोन्ही देशांतील सांस्कृतिक नातेसंबंधांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार कपिल देव यांचेही विशेष कौतुक केले.
मार्ल्स म्हणाले, “महान कपिल देव यांच्या शेजारी उभे राहणे ही माझ्यासाठी अत्यंत रोमांचक गोष्ट आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध आज अतिशय मजबूत आहेत. जीवनाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आणि क्रिकेटबद्दलचे प्रेम या दोन्ही गोष्टी आम्हाला एकमेकांशी जोडतात.”
विराटचे नाव ऑस्ट्रेलियातही तितकेच मोठे
विराट कोहलीच्या लोकप्रियतेबद्दल बोलताना मार्ल्स म्हणाले, “आजच्या घडीला कोहली हे ऑस्ट्रेलियातील एक मोठे नाव आहे. मात्र मी लहान असताना भारतीय क्रिकेटमध्ये बिशनसिंग बेदी हे मोठे नाव होते. क्रिकेट हा दोन्ही देशांना जोडणारा मजबूत धागा आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांसमोर आधुनिक जगात नेतृत्व करताना अनेक समान आव्हाने आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक महत्त्वाचे ठरत आहे.
IPL विजयानंतर विराटचे पुन्हा कौतुक
रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसरे विजेतेपद पटकावले. या विजयात विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी केली.
४२ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७५ धावा करत कोहलीने आरसीबीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेजलवूड आणि टिम डेविडचाही गौरव
मार्ल्स यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडू जोश हेजलवूड आणि टिम डेविड यांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला.
ते म्हणाले, “काल रात्री आरसीबीने शानदार विजय मिळवला. विराट कोहली ७५ धावांवर नाबाद राहिला आणि त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. मला विशेष आनंद याचा आहे की या विजयात जोश हेजलवूड आणि टिम डेविड यांचाही महत्त्वाचा वाटा होता.”
मार्ल्स यांनी हसतच पुढे म्हटले, “आरसीबीच्या या आयपीएल विजयातही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मजबूत मैत्री आणि द्विपक्षीय संबंधांची झलक पाहायला मिळाली.”
कपिल देव यांच्या ‘खुशी’ उपक्रमात सहभाग
या दौऱ्यात रिचर्ड मार्ल्स यांनी भारतीय क्रिकेटचे महान अष्टपैलू कपिल देव यांनी स्थापन केलेल्या ‘खुशी’ या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित कार्यक्रमालाही हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी मुलांशी संवाद साधला, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळले आणि समाजकार्यातील भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्याचा गौरव केला.
क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम मोडणारा विराट कोहली आता सीमांच्या पलीकडेही लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचेच रिचर्ड मार्ल्स यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.







