राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) २०२६ मध्ये भारताचा युवा बॉक्सर जादुमणी सिंह याला पुरुषांच्या ५५ किलो गटाच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या जाय डिक्सन याने ५-० अशा एकतर्फी निकालाने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले, तर जादुमणीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अंतिम सामन्याच्या पहिल्या फेरीत जादुमणीने ३-२ अशी आघाडी घेत दमदार सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत डिक्सनने वर्चस्व गाजवत सर्व पंचांची मते आपल्या बाजूने मिळवली आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
जादुमणीने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. त्याने ‘राऊंड ऑफ ३२’मध्ये स्कॉटलंडच्या एरन कलनचा ५-० असा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानच्या सुमामा रहमान, झांबियाच्या म्वेंगो म्वाले आणि नामिबियाच्या फिलिप पुमुलो मुताकेला हाओसेब यांनाही ५-० अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली.
मणिपूरचा जादुमणी सिंह हा भारतातील उदयोन्मुख बॉक्सर मानला जातो. २०२६ वरिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद आणि ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’ हा किताब त्याने पटकावला आहे. तसेच वर्ल्ड बॉक्सिंग कप, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. वर्ल्ड बॉक्सिंग कप २०२५ मध्ये रौप्य, तर उस्ती नाद लाबेम ग्रां प्री २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.







