ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये भारताने आपल्या पदकांचा श्रीगणेशा केला आहे. भारताच्या झंडू कुमार याने पुरुषांच्या ‘हेव्हीवेट’ पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या विजयासह झंडू कुमारने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे.
रोमहर्षक लढतीत केवळ ०.१ गुणाने रौप्यपदक हुकले
दोन गटांत पार पडलेल्या या अंतिम सामन्यात झंडू कुमारने १३०.९ गुणांच्या सर्वोत्तम कामगिरीसह ‘ग्रुप बी’मध्ये अव्वल स्थान पटकावले. त्याने युगांडाच्या डेनिस म्बाजीरा (११४.१) आणि ऑस्ट्रेलियाच्या बेन राइट (११०.९) यांना मागे टाकत पदकाच्या शर्यतीत भक्कम दावेदारी निर्माण केली होती.
एकत्रित (कंबाइंड) क्रमवारीनुसार, नायजेरियाच्या रिलुवान इद्रीसने १३२.८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर इंग्लंडच्या मॅथ्यू हार्डींगने १३१.० गुणांसह रौप्यपदक आपल्या नावावर केले. झंडू कुमार आणि रौप्यपदक विजेत्या हार्डींग यांच्यात अवघ्या ०.१ गुणांचा फरक राहिला. १३०.९ गुणांसह झंडूने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
दारिद्र्य आणि अपंगत्वावर मात करत रचला इतिहास
१ जानेवारी १९९७ रोजी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरनौत येथे जन्मलेला झंडू कुमार जन्मापासूनच पोलिओग्रस्त आहे. एका भाजी विक्रेत्याचा मुलगा असलेल्या झंडूने कौटुंबिक गरिबी आणि शारीरिक आव्हानांवर जिद्दीच्या जोरावर मात केली.
-
खेळाची सुरुवात: २०१७ मध्ये त्याने पॅरा-ॲथलीट म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली. सुरुवातीला F55 शॉटपुट आणि थाळीफेक (डिस्कस थ्रो) प्रकारात अनेक राज्य व जिल्हास्तरीय पदके जिंकली.
-
पॉवरलिफ्टिंगचा प्रवास: जिममधील स्ट्रेंथ ट्रेनिंगदरम्यान त्याची पॉवरलिफ्टिंगमध्ये आवड निर्माण झाली. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मिळालेल्या सल्ल्यानंतर त्याने पूर्ण लक्ष पॅरा पॉवरलिफ्टिंगकडे वळवले.
‘लाइटवेट’ प्रकारात अशोक मलिकचे पदक अवघ्या काही फरकाने हुकले
दरम्यान, दिवसाच्या सुरुवातीला पुरुषांच्या ‘लाइटवेट’ पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात भारताचा अशोक मलिक पदक जिंकण्यापासून थोडक्यात मुकला. २००० किलो वजन उचलूनही १४३.८ गुणांसह त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
मलेशियाच्या पॉनी बुन्याऊ गुस्टिनने १५३.५ गुणांसह कांस्यपदक जिंकले. या प्रकारात इंग्लंडच्या मार्क स्वानने १५३.९ गुणांसह सुवर्णपदक, तर नायजेरियाच्या रोलँड एजुरुईकने रौप्यपदक पटकावले. भारताचा दुसरा खेळाडू परमजीत कुमार १३५.६ गुणांसह सातव्या स्थानावर राहिला.







