34 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरस्पोर्ट्सदीप्तीची सुवर्णधाव; आशियाई विक्रमासह भारताचा डंका

दीप्तीची सुवर्णधाव; आशियाई विक्रमासह भारताचा डंका

Google News Follow

भारतीय पॅरा अॅथलीट दीप्ती जीवनजी हिने आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये आपल्या वेगाची छाप उमटवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. महिलांच्या ४०० मीटर टी२० प्रकारात दीप्तीने ५६.३६ सेकंदांची वेळ नोंदवत नवा गेम्स विक्रम प्रस्थापित केला. या दमदार कामगिरीसह तिने आपल्या सुवर्णपदकाचे यशस्वीपणे रक्षणही केले.

दीप्तीने २०२२ मध्ये नोंदवलेला ५६.५९ सेकंदांचा विक्रम मागे टाकला. यंदा तिने आपल्या आधीच्या वेळेत ०.२३ सेकंदांची सुधारणा करत नव्या विक्रमाची नोंद केली. तेलंगणातील २३ वर्षीय दीप्तीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे.

दीप्तीचा हा प्रवास संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे. बौद्धिक दिव्यांगत्वामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, तरी तिने खेळातील ध्येयापासून आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. वयाच्या १५व्या वर्षी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) प्रशिक्षक एन. रमेश यांनी राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तिच्यातील गुणवत्ता ओळखली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीप्तीच्या क्रीडा कारकिर्दीला योग्य दिशा मिळाली.

२०१९ मध्ये हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले पाऊल टाकले. पुढे ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२०’ मध्ये १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके जिंकत तिने आपली क्षमता सिद्ध केली. राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्येही तिने अनेक पदकांची कमाई केली.

आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये दीप्तीने गेम्स आणि आशियाई विक्रम मोडत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर २०२४ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने ५५.०७ सेकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रम केला आणि सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्तरावरील या यशानंतर आता आशियाई पॅरा गेम्समध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक आणि नवा गेम्स विक्रम अशी दुहेरी कामगिरी करत तिने भारतीय तिरंग्याचा मान उंचावला आहे.

दीप्तीची ही कामगिरी केवळ पदकापुरती मर्यादित नसून, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणत्याही आव्हानावर मात करता येते, याची प्रेरणा देणारी आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा