आयपीएल २०२६ चा थरार सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असताना मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा मंगळवारी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. “हिटमॅन नव्या सीझनसाठी सज्ज!” असे कॅप्शन देत संघात त्याचे स्वागत करण्यात आले. याआधीही एमआयने “मुंबईचा बादशाह आला!” असा व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला होता.
रोहित शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तब्बल ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल २०२६ साठी मुंबई इंडियन्सने त्याला १६.३० कोटी रुपयांत रिटेन केले आहे.
रोहितच्या आयपीएल कारकिर्दीकडे पाहिले तर त्याने आतापर्यंत २७२ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.७३ च्या सरासरीने ४७ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोर नाबाद १०९ धावा असा आहे. तसेच, त्याने आयपीएलमध्ये ३०२ षटकार ठोकले आहेत.
आयपीएल २०२६ साठी मुंबई इंडियन्सने तयारीला सुरुवात केली असून संघातील शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडेय, अल्लाह गझनफर, नमन धीर, राजा अंगद बावा, रॉबिन मिंज, रघु शर्मा, मयंक रावत, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार आणि अश्वनी कुमार यांनी सराव सुरू केला आहे. आता रोहित शर्मा देखील संघासोबत सराव करताना दिसणार आहे.
या हंगामात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २९ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. विजयी सुरुवात करण्यासाठी एमआय सज्ज झाली आहे.







