भारताने टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद कायम राखत इतिहास रचला आहे. यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ८ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड क्रिकेट संघाला एकतर्फी पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. तर पाकिस्तानचा माजी सलामीवीर अहमद शहजाद यांनी पाकिस्तान क्रिकेट व्यवस्थेवर कठोर टीका केली आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि “रावलपिंडी एक्सप्रेस” या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले शोएब अख्तर यांनी भारताच्या विजयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आरोप केला की, भारत आपल्या सोयीप्रमाणे क्रिकेट चालवत आहे आणि त्यामुळे खेळाचे नुकसान होत आहे. अख्तर म्हणाले, “हे असं आहे जसं एखाद्या वस्तीमध्ये एक श्रीमंत मुलगा असतो आणि तो गरीब मुलांना बोलावून म्हणतो– ‘या, क्रिकेट खेळूया’, पण जिंकणार मात्र मीच. भारत आमच्यासोबत अगदी हेच करत आहे. आठ संघांपैकी ते चार संघ ठेवतात आणि त्या चारांपैकी पुन्हा तीन संघांना बोलावतात आणि पुढे जातात, आणि मग म्हणतात– ‘पाहा, मी जिंकलो.’ त्यांनी क्रिकेट पूर्णपणे बर्बाद केले आहे.”
दुसरीकडे पाकिस्तानचे माजी सलामीवीर अहमद शहजाद यांनी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट व्यवस्थेची तुलना करत पाकिस्तानमधील समस्यांकडे लक्ष वेधले. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की पाकिस्तानमध्ये प्रतिभेची कमतरता नाही, मात्र अडचण व्यवस्थेमध्ये आहे. शहजाद म्हणाले, “पाकिस्तानमध्ये टॅलेंट खूप आहे. टॅलेंटची कमतरता नाही, कमतरता आहे ती आपल्या सिस्टममध्ये. भारतात काय आहे? तिथे टॅलेंट आणि सिस्टम दोन्ही आहेत. त्यामुळेच तिथे सातत्याने चांगले खेळाडू तयार होत आहेत.”
हे ही वाचा:
१४ वर्षांनंतर बेपत्ता हिंदू मुलीची सुटका; मुन्ना अन्सारीवर अपहरण, धर्मांतर, बलात्काराचा आरोप
उस्मान हादी हत्येतील दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक
इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या पुढे
झोपेचा अभाव: आरोग्यासाठी धोक्याची घंटा
त्यांनी पुढे सांगितले की पाकिस्तानचा संघ अनेकदा कमी धावसंख्येचे लक्ष्य ठेवून खेळतो आणि बोर्ड तुलनेने कमजोर संघांविरुद्ध मालिकांचे आयोजन करतो. त्याउलट भारत मजबूत संघांविरुद्ध खेळून आपल्या खेळाडूंना अधिक सक्षम बनवतो. शहजाद म्हणाले, “मी आधीच सांगितले होते की ते खेळले तर २५० धावा करतील. आपण तिथे असतो तर १८० धावा करून बसलो असतो आणि मग म्हणालो असतो की १८० झाल्या आहेत, आता गोलंदाजांनी बचाव करावा. आणि मग झिम्बाब्वे, केनिया, युगांडा यांना बोलावून त्यांच्याविरुद्ध जिंकत राहा.”







