टी-२० विश्वचषक २०२६ जिंकलेल्या भारतीय संघाचा जुलै महिन्यात जिम्बाब्वे दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्यात भारत आणि जिम्बाब्वे यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
ही सामने २३, २५ आणि २६ जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे पार पडणार असून, सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४:३० वाजता सुरू होतील.
भारतीय संघ यापूर्वी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळून जिम्बाब्वेला पोहोचणार आहे. दुसरीकडे, टी-२० विश्वचषक २०२६ मधील दमदार कामगिरीनंतर जिम्बाब्वेचा संघ या मालिकेत आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
जिम्बाब्वे क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक गिवमोर माकोनी म्हणाले,
“भारताविरुद्ध खेळणे नेहमीच रोमांचक असते. आमच्या खेळाडूंना विश्वविजेत्या संघाविरुद्ध घरच्या मैदानावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे.”
ते पुढे म्हणाले की,
“विश्वचषकातील यशानंतर ही मालिका आम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्पर्धात्मक ताकद म्हणून पुढे जाण्यासाठी मोठा आधार देईल.”
दरम्यान, बीसीसीआयने आधीच जाहीर केलं आहे की जिम्बाब्वे संघ जानेवारी २०२७ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. हे सामने ३, ६ आणि ९ जानेवारी रोजी अनुक्रमे कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई येथे होतील.
२००२ नंतर प्रथमच जिम्बाब्वे भारतात द्विपक्षीय मालिकेसाठी येणार असल्याने हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.







