भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला विश्वचषकातील रोमांचक सामन्यापूर्वी पुन्हा एकदा ‘नो हँडशेक’ धोरण चर्चेत आले आहे. भारताच्या कर्णधार हरमनप्रीत कौर हिने रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर टॉसदरम्यान पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्वांचं लक्ष वेधलं ते म्हणजे दोन्ही देशांच्या कर्णधारांकडे. या दोन कर्णधारांनी ना एकमेकांकडे पाहिलं, ना हस्तांदोलन केलं. दोघी स्वतंत्रपणे टॉससाठी मैदानावर आल्या आणि टॉस झाल्यानंतर मेल जोन्स यांच्याशी संवाद साधून परत आपल्या संघाकडे निघून गेल्या.
ही दृश्ये पाहून क्रिकेटप्रेमींनी लगेचच पुरुष आशिया कपमधील घटनेची आठवण काढली. त्या सामन्यात प्रथमच भारतीय संघाने पाकिस्तानसोबत हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. माहितीनुसार, या निर्णयामागे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तसेच भारत सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. पुरुष आशिया कपदरम्यान तीन सामने भारत-पाकिस्तानदरम्यान खेळले गेले, आणि प्रत्येकवेळी भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळले होते.
आता हीच भूमिका महिला संघानेही कायम ठेवली आहे.
राजनैतिक तणावाची पार्श्वभूमी
या ‘नो हँडशेक’ धोरणामागे केवळ क्रीडा नव्हे तर राजनैतिक कारणेही आहेत. एप्रिलमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव तीव्र झाला होता. त्यांनंतर भारताने स्पष्ट केलं की, पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका होणार नाहीत, आणि फक्त आंतरराष्ट्रीय किंवा तटस्थ स्पर्धांमध्येच सहभाग असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा द्विपक्षीय क्रिकेट मालिका सामना २०१२-१३ मध्ये झाला होता. आता झालेला हा सामना देखील कडक सुरक्षा बंदोबस्तात खेळवण्यात आला.
महिला विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचा संपूर्ण मुक्काम कोलंबोमध्येच आहे, तर भारताचे सामने गुवाहाटी आणि कोलंबो येथे खेळवले जात आहेत. जर पाकिस्तान उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचला, तर त्यांचे सामनेही कोलंबोमध्येच, त्याच सुरक्षा व्यवस्थेखाली खेळले जाणार आहेत.
हे ही वाचा:
दंत शस्त्रक्रिया पदवीधारक तरुणाची अमेरिकेत गोळी घालून हत्या!
पहलगाम हल्ला प्रकरण: टीआरएफ दहशतवादी सज्जादची २ कोटींची मालमत्ता जप्त
बंगालच्या दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, भूस्खलनात ६ जणांचा मृत्यू!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना – उत्तर मुंबईकडून बळीराजाला मदतीचा हात
हरमनप्रीतची घोषणा – एक बदल संघात
नाणेफेकीवेळी हरमनप्रीत कौर म्हणाली, “विश्वचषकापूर्वी इथे आम्ही एक चांगली मालिका खेळलो. आम्ही सकारात्मक आहोत आणि चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा ठेवतो. दुर्दैवाने अमनजोत जखमी झाली आहे, त्यामुळे रेणुका ठाकूर तिच्या जागी खेळेल. संघातील एकोपा उत्तम आहे आणि आजच्या सामन्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘हँडशेक वाद’ हा केवळ शिष्टाचाराचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो दोन्ही देशांतील तणावाचे प्रतिक बनला आहे. हरमनप्रीत कौरच्या या कृतीने स्पष्ट केले की, भारतीय संघ सरकारच्या राजनैतिक भूमिकेला अनुसरून वागत आहे, आणि हा निर्णय केवळ खेळाच्या सीमित चौकटीतला नाही.







