टीम इंडियाने रविवारी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आणखी एक ऐतिहासिक विजय मिळवला. विशेष म्हणजे केवळ १६१ दिवसांच्या कालावधीत भारताने क्रिकेट विश्वातील सहा मोठे किताब जिंकत आपली बादशाही सिद्ध केली आहे.
एशिया कप २०२५ :
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध भारताने ५ विकेट्सने एशिया कप जिंकला. २८ सप्टेंबर रोजी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचा डाव १९.१ षटकांत १४६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने १९.४ षटकांत लक्ष्य गाठले.
विमेन्स ब्लाइंड टी-२० वर्ल्ड कप २०२५ :
कोलंबो येथे २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात नेपाळने ५ बाद ११४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १२.१ षटकांत ७ विकेट्स राखून सामना जिंकत किताब पटकावला.
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ :
डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने ७ बाद २९८ धावा केल्या. शेफाली वर्माने ८७, तर दीप्ती शर्माने ५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांवर संपला आणि भारताने ५२ धावांनी विश्वचषक जिंकला.
अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ :
हरारे स्पोर्ट्स क्लबवर ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करत ९ बाद ४११ धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव ४०.२ षटकांत ३११ धावांवर संपला.
एसीसी विमेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ :
बँकॉक येथील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडवर २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात भारत-एने ७ बाद १३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव १९.१ षटकांत ८८ धावांवर आटोपला आणि भारताने ४६ धावांनी किताब जिंकला.
टी-२० वर्ल्ड कप २०२६ :
८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद २५५ धावा केल्या. संजू सॅमसनने ८९, अभिषेक शर्माने ५२, तर ईशान किशनने ५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १९ षटकांत १५९ धावांवर आटोपला.







