एसोसिएट देशांमध्ये क्रिकेटच्या विकासासाठी आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी मोठी पावले उचलली आहेत, अशी प्रशंसा नामीबिया क्रिकेटचे अध्यक्ष रूडी वॅन वुरेन यांनी केली आहे.
रूडी वॅन वुरेन म्हणाले, “आयसीसी सध्या एसोसिएट देशांना बळकट करण्याच्या धोरणावर काम करत आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक बदल झाले आहेत. ते नामीबियामध्ये उभारलेल्या आमच्या नव्या स्टेडियमला भेट देऊन गेले. त्या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आयसीसीची महत्त्वाची भूमिका आहे.”
ते पुढे म्हणाले की, “नामीबिया सारखी टीम जर विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळत असेल, तर त्यामागे आयसीसीच्या पाठबळाचा मोठा वाटा आहे. मिळालेल्या सुविधांचा योग्य उपयोग करून आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करायला हवा. एसोसिएट देश हेच क्रिकेटचे भविष्य आहेत, हे आम्हाला जगाला दाखवायचे आहे.”
दरम्यान, नामीबिया संघ टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी झाला आहे. ग्रुप ‘अ’मध्ये नामीबियासोबत भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पहिल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध नामीबियाला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
आता गुरुवारी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर गतविजेता आणि सहयजमान भारताविरुद्ध नामीबियाचा सामना होणार आहे. आफ्रिकन संघासाठी हा सामना अत्यंत कठीण असणार आहे.
भारत आणि नामीबिया यांच्यात यापूर्वी फक्त एकच टी-२० सामना खेळला गेला आहे. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी दुबई येथे झालेल्या त्या सामन्यात नामीबियाने ८ बाद १३२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १ बाद १३६ धावा करत ९ विकेट्सने विजय मिळवला होता.







