जेमिमा ठरली भारताची तारणहार, ऑस्ट्रेलियावर भलामोठा विजय मिळवत भारत ‘फायनल’मध्ये

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

जेमिमा ठरली भारताची तारणहार, ऑस्ट्रेलियावर भलामोठा विजय मिळवत भारत ‘फायनल’मध्ये

जर हरमनप्रीत कौरने २०१७ मध्ये चमत्कार केला असेल, तर २०२५ मध्ये तेच काम नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आपल्या घरच्या मैदानात जेमिमा रॉड्रिग्जने करून दाखवले. आठ वर्षांच्या अंतराने, पुन्हा एकदा भारतीय महिला संघातील फलंदाजीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या सीमांच्या पलीकडे जाऊन खेळ करत संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवलं. अखेर, जगातील सर्वोत्कृष्ट संघाला हरवण्यासाठी काहीतरी विलक्षण घडावं लागतं आणि एकदिवसीय विश्वचषक नॉकआउट इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग पार करायचा असेल तर तेही काही साधं काम नाही.

ऐन मोक्याच्या क्षणी कच खाण्याची परंपरा मोडित काढत भारतीय महिला संघाने नवी मुंबईतील खचाखच भरलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने ठेवलेले ३३९ धावांचे अत्यंत कठीण आव्हान यशस्वीरित्या पार केले आणि एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयासह भारतीय महिला संघ २०२५ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला.

हे पहिल्यांदाच घडलं की, विश्वचषक बादफेरीच्या सामन्यात (पुरुष किंवा महिला) ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार करण्यात आलं. याआधी, २०१५ च्या पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑकलंडमध्ये २९८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तो विक्रम भारतीय महिलांनी मागे टाकला.

या ऐतिहासिक कामगिरीच्या केंद्रस्थानी होती जेमिमा. या स्पर्धेच्या आधी संघनिवड करताना ११ खेळाडूत जिला स्थान मिळेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती. तिने भारताला अंतिम फेरीत धडक मारून दिली. जेमिमाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. अर्थात तिला नशीबाची थोडी साथ लाभली. पण नाबाद १२७ धावांची खेळी करत तिने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. भारताने पाच विकेट्स राखून आणि नऊ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला.

कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील ८८ चेंडूत अप्रतिम ८९ धावा करत जेमिमाला तोलामोलाची साथ दिली. स्मृती मंधाना (२४), दीप्ती शर्मा (२४) आणि ऋचा घोष (२६) यांच्या खेळीही महत्त्वाच्या ठरल्या.

शफाली वर्मा आणि मंधानाच्या बाद झाल्यानंतर २ बाद ५९ या कठीण परिस्थितीत जेमिमाने खेळपट्टीवर पाऊल ठेवले. तिने संयम, आत्मविश्वास आणि परिपक्वतेने फलंदाजी केली. हरमनप्रीत कौरसोबत तिची १६७ धावांची तिसऱ्या विकेटची भागीदारी सामन्याचा निर्णायक टप्पा ठरली.

जेमिमा ८२ धावांवर असताना अलाना किंगच्या गोलंदाजीवर हीलीने तिचा झेल टाकला आणि त्याचा ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला. हरमनप्रीत ८९ धावांवर बाद झाली तेव्हा अजून ११३ धावा हव्या होत्या, पण जेमिमाने स्थैर्य राखलं. दीप्ती आणि ऋचा बाद झाल्या तरी ती शांत राहून लक्ष्याच्या दिशेने संघाला नेले. जेमिमाने आपले शतक उपस्थित चाहत्यांच्या जल्लोषात साजरे केले. पण शतकपूर्तीनंतर १०६ धावांवर तिला पुन्हा जीवदान मिळाले. ताहलिया मॅग्राथने झेल सोडला आणि जेमिमाने त्याचा पूर्ण फायदा घेतला.

जेव्हा अमनजोत कौरने कव्हर्समधून विजयी चौकार मारला, तेव्हा भारतीय खेळाडू आणि प्रेक्षक जल्लोषात न्हाऊन निघाले. अश्रू, आनंद आणि अभिमान यांचे मिश्र दृश्य मैदानावर दिसले.

विश्वचषकातील गेल्या १५ सामन्यात ऑस्ट्रेलियाला कुणीही पराजित करू शकले नव्हते. ती कामगिरी भारताने करून दाखविली. भारत रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

हे ही वाचा:

रोहित आर्यला माजी शिक्षणमंत्री केसरकर यांच्याकडून कोणते पैसे हवे होते?

चेन्नईत दुपारीच खून

खोकला किंवा दम्यावर काय आहे रामबाण ?

साउथ आफ्रिकेची कप्प झाली ‘विकेट क्वीन’!

याआधी ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फोबी लिचफिल्डने ९३ चेंडूत ११९ धावा करत चमकदार शतक झळकावले आणि संघाला ३३८ धावांपर्यंत पोहोचवले. अ‍ॅलिसा हीलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आणि ढगाळ वातावरणात फलंदाजांना अनुकूल परिस्थितीचा फायदा घेतला.

लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. पेरीने ८३ चेंडूत ७७ धावा करत सुंदर खेळी केली.

२२ वर्षीय लिचफिल्डने आपल्या पहिल्या विश्वचषक शतकासह तिसरे एकदिवसीय शतक पूर्ण केले. तिच्या खेळीत १७ चौकार आणि ३ षटकार होते. अखेर ती अमनजोत कौरकडून बाद झाली, पण त्याआधीपर्यंत तिने भारतीय गोलंदाजांना त्रास दिला होता.

भारतीय गोलंदाजांमध्ये श्री चरणी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर राधा यादवने पेरीचा गडी झेलबाद करत गृहमैदानात उत्साह निर्माण केला.

Exit mobile version