“मंजिल त्यांनाच मिळते, ज्यांच्या स्वप्नांत जीव असतो… पंखांनी नाही, तर हौसल्याने उंच भरारी घेता येते.” या ओळी भारताच्या स्टार लाँग जंपपटू मुरली श्रीशंकर यांच्यावर अगदी तंतोतंत लागू होतात. अनेक वेळा दुखापतींनी त्यांना खचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कधीही हार मानली नाही.
मुरली श्रीशंकर यांचा जन्म २७ मार्च १९९९ रोजी केरळमधील पलक्कड येथे झाला. ते क्रीडापरंपरेतूनच आले आहेत. त्यांचे वडील एस. मुरली हे स्वतः आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेते होते, तर आई के. एस. बिजिमोल या माजी खेळाडू होत्या.
मुरली यांनी अवघ्या ४व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. १३व्या वर्षी त्यांनी ट्रिपल जंप आणि नंतर लाँग जंपमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. या खेळात त्यांनी सातत्याने प्रगती करत अनेक मोठी यश संपादन केली. मात्र, २०१८ साली अपेंडिसायटिसमुळे त्यांना कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होता आले नाही.
तरीही त्यांनी या आजारावर मात करत दमदार पुनरागमन केले. २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी ८.०८ मीटरची उडी मारत रौप्यपदक जिंकले. त्याच वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक पटकावले.
पोर्तुगालमध्ये झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले, तर डायमंड लीगमध्ये तिसरे स्थान मिळवले. मात्र, नशिबाने पुन्हा साथ दिली नाही आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यांना २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळता आले नाही.
पण मुरली यांची जिद्द अढळ राहिली. त्यांनी पुन्हा एकदा शानदार पुनरागमन करत २०२५ मध्ये कझाकिस्तानमध्ये झालेल्या कोसानोव मेमोरियल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. २०२४ साली त्यांना ‘अर्जुन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
आगामी कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिंपिक स्पर्धांमध्ये मुरली श्रीशंकर यांच्याकडून भारताला आणखी पदकांची मोठी अपेक्षा आहे.







