28.1 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरस्पोर्ट्सशॉटगनमध्ये नीरू धांडाने दिले भारताला पाचवे सुवर्णपदक

शॉटगनमध्ये नीरू धांडाने दिले भारताला पाचवे सुवर्णपदक

आशियाई विक्रम

Google News Follow

Related

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या वैयक्तिक सुवर्णपदकाची तब्बल दहा दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली. रायफल किंवा पिस्तूलच्या लोकप्रिय प्रकारांमध्ये नव्हे, तर शॉटगनच्या ट्रॅप प्रकारात भारतीय लष्कराची नेमबाज नीरू धांडा हिने महिलांच्या ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. हे भारताचे पाचवे सुवर्णपदक ठरले असून या पदकासह भारत एकूण ४७ पदके जिंकून ११व्या स्थानी आहे.

२६ वर्षीय नीरू धांडाने मंगळवारी आयची प्रांतातील जनरल शूटिंग गॅलरी येथे मुसळधार पावसात झालेल्या अंतिम फेरीत शानदार कामगिरी केली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ट्रॅप प्रकारातील भारताचे हे पहिलेच वैयक्तिक सुवर्णपदक ठरले.

स्पर्धेच्या अवघ्या दहा दिवस आधी नीरूला फ्लूची तीव्र लागण झाली होती. मात्र, आजारावर मात करत तिने स्पर्धेत सहभाग घेतला आणि अंतिम फेरीत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यापूर्वी तिने भारतीय महिला संघाला ट्रॅप प्रकारात रौप्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महिलांच्या ट्रॅपच्या पात्रता फेरीत नीरूने १२५ पैकी ११८ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले होते. तीन दिवस चाललेल्या पात्रता फेरीत पाच मालिकांमध्ये खेळाडूंच्या सातत्याची आणि बदलत्या हवामानातील कामगिरीची कसोटी घेण्यात आली. अंतिम फेरीत नीरूने ३० पैकी २८ लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. या कामगिरीसह तिने यापूर्वीचा आशियाई विक्रम तब्बल चार शॉट्सनी सुधारला. चीनच्या सन युनोंग हिने ३० पैकी २६ लक्ष्य साध्य करत रौप्यपदक मिळवले, तर कुवेतच्या हाजर अब्दुलमलिक हिने २५ पैकी २१ लक्ष्य साधत कांस्यपदक पटकावले.

अंतिम मालिकेपूर्वी नीरूकडे दोन गुणांची आघाडी होती. मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांवर येणाऱ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर तिच्यासमोर मोठे आव्हान होते. त्यातच मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र, नीरूने संयम आणि एकाग्रता कायम ठेवत निर्णायक क्षणी पाचही लक्ष्य अचूक साधले आणि चीनच्या सन युनोंगला मागे ठेवले. नीरूने संपूर्ण अंतिम फेरीत केवळ दोन शॉट्स चुकवले. दुसऱ्या आणि पाचव्या मालिकेत तिच्याकडून प्रत्येकी एक लक्ष्य चुकले.

चुलत भाऊ लक्ष्यकडून मिळाली प्रेरणा

नीरू धांडाने लहानपणापासून नेमबाज होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. तिचा या खेळातील प्रवेश तिचा चुलत भाऊ लक्ष्य शेरॉन याच्यामुळे झाला. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅप नेमबाजीत रौप्यपदक जिंकलेल्या लक्षयला पाहून नीरूला या खेळाची आवड निर्माण झाली.

सुरुवातीच्या काळात लक्ष्यने नीरूला मोठी मदत केली. ती त्याच्यासोबत सराव करत असे आणि त्याने दिलेल्या बंदुकीचा वापर करत असे. त्याआधी नीरूने वडिलांच्या मदतीने कुटुंबाच्या डबल-बॅरल बंदुकीने टिनच्या डब्यांवर नेम साधण्याचा सराव केला होता. बंदुकीच्या गोळीबाराचा धक्का सहन करण्याची सवय तिला त्यातून लागली.

२०१९ मध्ये तिने मध्य प्रदेश शूटिंग अकादमीत प्रवेश घेतला. “माझा चुलत भाऊ लक्ष्य शेरॉन, जो २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतील ट्रॅपचा रौप्यपदक विजेता आहे, त्याने मला ट्रॅप शूटिंग स्वीकारण्यासाठी प्रेरित केले. भोपाळमधील मध्य प्रदेश शूटिंग अकादमीत गेले, कारण तिथे मला बंदूक आणि दारूगोळा मोफत मिळत होता,” असे नीरूने सुवर्णपदक जिंकल्यानंतर सांगितले.

हे ही वाचा:

पॉलिसीबाजारचा शेअर ४३ टक्क्यांनी कोसळला

चीनच्या बीआरआयला भारताचा ‘पॉवर काउंटर’

गोल्डी ब्रार एफबीआयच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत

तृणमूलचे इंद्रनील सेन यांच्या घरावर ईडीची धाड

हरियाणातील जींद येथील नीरूने पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. २०२२ मध्ये ओसिजेक येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने पदार्पण केले. २०२५ मध्ये तिने पहिले आशियाई अजिंक्यपद सुवर्णपदक जिंकले. २०२६ मध्ये इटलीतील लोनाटो येथे तिने महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात आयएसएसएफ विश्वचषक सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. महिलांच्या वैयक्तिक ट्रॅपमध्ये आयएसएसएफ विश्वचषक सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

नीरू भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिसमध्ये नायब सुभेदार असून मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी मार्क्समनशिप युनिटमध्ये प्रशिक्षण घेते. जींदमध्ये कुटुंबाच्या बंदुकीने टिनच्या डब्यांवर नेम साधण्यापासून सुरू झालेला नीरूचा प्रवास आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकापर्यंत पोहोचला आहे. तिच्या या कामगिरीने भारताच्या नेमबाजीच्या इतिहासात आणखी एका महत्त्वपूर्ण अध्यायाची भर पडली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा