अखेर पाकिस्तानी क्रिकेट संघाला गुडघे टेकावे लागले. पाकिस्तानी सरकारने पुरुष क्रिकेट संघाला आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध होणारा नियोजित सामना खेळण्याची परवानगी दिली आहे. हा सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) आयसीसीकडे भारताविरुद्धचा आपला सामना अन्य ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने बीसीबीची ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सहभागी करून घेण्यात आले.
यानंतर पाकिस्तान सरकारने सुरुवातीला आपल्या संघाला भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा आदेश दिला होता, जेणेकरून बांगलादेशला पाठिंबा दर्शवता येईल. मात्र, भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याच्या पाकिस्तानच्या धमकीवर आयसीसीने कडक भूमिका घेतली. तसेच बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) आणि श्रीलंका सरकारकडून पाकिस्तानला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पुरुष संघाला सामना खेळण्याची परवानगी दिली आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातून डाळींबही येत नाहीत, पण दहशतवादी येतात!
ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा डाव
माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे पुस्तक बाहेर आणले कुणी? पोलिसात एफआयआर
पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले की बांगलादेश आणि श्रीलंकेकडून आलेल्या विनंत्यांमुळेच १५ फेब्रुवारी रोजी होणारा सामना खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तान सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तान सरकारने बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून पीसीबीला पाठवण्यात आलेल्या औपचारिक विनंत्यांचा तसेच श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर सदस्य देशांकडून मिळालेल्या समर्थन संदेशांचा आढावा घेतला आहे. या संदेशांमध्ये सध्याच्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानच्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. सरकारने बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्या निवेदनाचीही दखल घेतली आहे. बंधुभाव असलेल्या देशाकडून व्यक्त करण्यात आलेल्या या खोल कृतज्ञतेचे आम्ही मनापासून स्वागत करतो. पाकिस्तान बांगलादेशसोबत खांद्याला खांदा लावून उभा असल्याची पुनःपुष्टी करतो.”
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “रविवारी सायंकाळी पंतप्रधानांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमारा दिसानायके यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या उबदार आणि मैत्रीपूर्ण संभाषणात त्यांनी आठवण करून दिली की पाकिस्तान आणि श्रीलंका नेहमीच एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहेत, विशेषतः कठीण काळात. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना सध्याच्या कोंडीवर सौहार्दपूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचा गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली.”
सोमवारी रात्री पाकिस्तान सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बहुपक्षीय चर्चेच्या निष्कर्षांचा आणि मित्र राष्ट्रांच्या विनंत्यांचा विचार करून, पाकिस्तान सरकार आयसीसी मेंस टी-२० वर्ल्ड कपमधील नियोजित सामन्यासाठी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाला १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मैदानात उतरण्याचे निर्देश देत आहे.”







