आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे पाकिस्तानच्या राष्ट्रीय हॉकी संघातील खेळाडूंना अक्षरशः रस्त्यावर थांबावे लागले. वृत्तांनुसार, ज्या हॉटेलमध्ये संघाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचे बिल पाकिस्तान हॉकी महासंघाने भरले नव्हते. वेळेत देयक न भरल्यामुळे हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले.
कॅनबेराला पोहोचल्यावर खेळाडूंना कळले की त्यांच्या खोल्यांची नोंदणी रद्द झाली आहे. परिणामी, संघाला अनेक तास रस्त्यावरच थांबावे लागले. पाकिस्तानचा हॉकी संघ सध्या ऑस्ट्रेलियातील हॉबार्ट येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दौऱ्यावर आहे. आधीच कामगिरीबाबत संघर्ष करत असलेल्या संघाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. प्रो लीगमधील सहाही सामने पाकिस्तानने गमावले आहेत.
वृत्तांनुसार, खेळाडू आणि व्यवस्थापनासाठी कॅनबेरातील चार-तारांकित हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्याचे आणि बिल भरल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संघ पोहोचल्यावर बिल न भरल्यामुळे बुकिंग रद्द झाल्याचे स्पष्ट झाले. वेळेतील फरकामुळे प्रशिक्षक ताहिर झमान यांना हॉकी महासंघाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आला नाही. लाहोरहून दीर्घ प्रवास करून आलेल्या खेळाडूंना विश्रांतीसाठी जागाच नव्हती.
हे ही वाचा:
बंंगाल SIR : एकाच महिन्याच्या अंतरात दोन मुले जन्माला कशी आली?
ऑपरेशन सिंदूरमध्ये गेम चेंजर ठरलेल्या S-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीला मंजुरी
भारतात होणार ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026
फुटबॉलचा बादशाह इटली, पण आज क्रिकेटमध्येही गोल!
अनेक तासांनंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी थकलेल्या खेळाडूंना काही खोल्या उपलब्ध करून दिल्या. मात्र खोल्या मर्यादित असल्याने दोन-तीन खेळाडूंना एकाच खोलीत राहावे लागले. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-३ असा पराभव झाला.
या दौऱ्यावर पाकिस्तान संघ नियमित व्यवस्थापकाविना आहे. माजी ऑलिंपियन अंजुम सईद यांना विमानप्रवासादरम्यान धूम्रपान केल्याच्या आणि विमानतळ कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याच्या आरोपांनंतर महासंघाने पदावरून हटवले होते. स्थानिक पाकिस्तानी नागरिकांकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर अखेर संघाला हॉटेलचे बिल भरता आल्याचेही वृत्त आहे.
आर्थिक अडचणींमुळे संघाला फटका बसण्याची ही पहिली वेळ नाही. अर्जेंटिनामध्ये झालेल्या FIH प्रो लीगच्या पहिल्या टप्प्यातही निधीअभावी खेळाडूंना रोजचे भत्ते मिळाले नव्हते, अशी माहिती आहे.







