भारतीय टेबल टेनिसमधील आघाडीच्या खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या श्रीजा अकुला हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये शरथ कमलसोबत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या श्रीजाने डब्ल्यूटीटी कंटेंडर स्तरावरील एकेरीचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरत इतिहास रचला.
३१ जुलै १९९८ रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या श्रीजाच्या वडिलांची खासगी विमा कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी होती. तिची मोठी बहीण रावली महाविद्यालयीन स्तरावर टेबल टेनिस खेळत होती. तिच्याच प्रेरणेने श्रीजाने टेबल टेनिसची ओळख करून घेतली आणि या खेळात करिअर घडवण्याचा निर्णय घेतला.
मोठ्या बहिणीसोबत खेळातील बारकावे शिकत असताना श्रीजाने नंतर सोमनाथ घोष यांच्या अकादमीत प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, खेळाबरोबरच शिक्षणातही ती तितकीच हुशार होती. बारावीच्या परीक्षेत तिने ९८.७ टक्के गुण मिळवले होते.
२०१९ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीजाने महिला दुहेरी आणि सांघिक प्रकारात दोन सुवर्णपदके जिंकून आपली क्षमता सिद्ध केली. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्यीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरी आणि दुहेरी अशी दोन्ही विजेतेपदे पटकावत तिने आपला दबदबा कायम ठेवला.
श्रीजाच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरले ते २०२२. याच वर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्ये शरथ कमलसोबत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी छाप पाडली.
यानंतर जानेवारी २०२४ मध्ये टेक्सास येथे झालेल्या डब्ल्यूटीटी फीडर कॉर्पस क्रिस्टी स्पर्धेत तिने पहिले डब्ल्यूटीटी एकेरी विजेतेपद पटकावले. त्यानंतर जून २०२४ मध्ये नायजेरियातील लागोस येथे झालेल्या डब्ल्यूटीटी कंटेंडर स्पर्धेत चीनच्या डिंग यिजिये हिचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. या कामगिरीसह ती डब्ल्यूटीटी कंटेंडर स्तरावरील एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.
याच स्पर्धेत अर्चना कामथ हिच्यासोबत महिला दुहेरीचे विजेतेपदही तिने आपल्या नावावर केले. टेबल टेनिसमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने २०२२ मध्ये श्रीजा अकुलाला अर्जुन पुरस्काराने गौरविले आहे.







