30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरस्पोर्ट्सआडवाणींची विश्वविजयी कामगिरी; २०२७ चा क्रूसिबल कप भारतात

आडवाणींची विश्वविजयी कामगिरी; २०२७ चा क्रूसिबल कप भारतात

Google News Follow

भारताचा स्टार स्नूकरपटू पंकज आडवाणी याने आंतरराष्ट्रीय स्नूकरमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. इंग्लंडमधील रीडिंग येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या क्रूसिबल कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावत तो हा किताब जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. विशेष म्हणजे, या विजयामुळे २०२७ मधील क्रूसिबल कप स्पर्धेचे यजमानपदही भारताला मिळाले आहे. आडवाणीने अंतिम सामन्यात माल्टाच्या टोनी ड्रॅगोचा ६-० असा धुव्वा उडवत एकतर्फी विजयाची नोंद केली.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत आडवाणीने सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवला. जागतिक स्तरावरील नामांकित स्नूकरपटूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत त्याने आपल्या अचूक खेळाचे आणि अफलातून कौशल्याचे दर्शन घडवले. गतविजेता नील रॉबर्टसन याला पराभूत करून त्याने स्पर्धेची दमदार सुरुवात केली. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडच्या जो पेरीला नमवत अंतिम फेरीत धडक मारली.

अंतिम सामन्यात आडवाणीसमोर टोनी ड्रॅगोचे आव्हान होते. मात्र, भारतीय खेळाडूने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्रातच ४-० अशी आघाडी घेत त्याने प्रतिस्पर्ध्याला दबावाखाली आणले. त्यानंतरही आपल्या खेळातील सातत्य कायम राखत एकही फ्रेम गमावता ६-० असा दणदणीत विजय मिळवला आणि क्रूसिबल कपवर आपले नाव कोरले.

या ऐतिहासिक विजयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुढील वर्षीच्या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी अंतिम सामन्यापूर्वीच विजेत्या खेळाडूच्या मायदेशात २०२७ ची स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आडवाणीच्या विजयासह भारताला आंतरराष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे यजमानपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

या विजयानंतर आडवाणीला क्रूसिबल कप ट्रॉफीसह २५ हजार पौंडांचे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत रॉनी ओ’सुलिव्हन, नील रॉबर्टसन, वू यिजे, झेंग यूबो आणि जो पेरी यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा सहभाग होता. अशा तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आडवाणीने मिळवलेले यश भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना आडवाणी म्हणाला की, स्पर्धेतील प्रतिस्पर्ध्यांचा दर्जा आणि आव्हान पाहता आपण ही ट्रॉफी जिंकू, असे कधीच वाटले नव्हते. मात्र, जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि त्यातून मिळालेले विजेतेपद यामुळे हा विजय अधिक खास ठरल्याचे त्याने सांगितले.

या यशामुळे पंकज आडवाणीने पुन्हा एकदा जागतिक स्नूकरमध्ये भारतीय तिरंगा उंचावला असून, २०२७ मध्ये भारतात होणाऱ्या क्रूसिबल कप स्पर्धेकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा