भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू जेमिमा रोड्रिग्स हिला भारतीय क्रिकेटमधील दिग्गज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एक अनोखी भेट दिली आहे. ही भेट म्हणजे चक्क बॅटच्या आकाराची खास गिटार असून, हा क्षण जेमिमासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
शुक्रवारी गावस्करांनी जेमिमाला हा खास गिटार भेट म्हणून दिला. गिफ्ट उघडताच जेमिमाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गिटारची कलाकुसर पाहून तिने भरभरून कौतुक केले. यावेळी दोघांनी मिळून ‘ये दोस्ती’ हे गाणेही गायले आणि उपस्थितांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला.
हा किस्सा महिला विश्वचषकाशी जोडलेला आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमाने केलेल्या संस्मरणीय शतकामुळे भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्या विजयानंतर गावस्करांनी जेमिमाला आश्वासन दिले होते की भारतीय संघाने जर विजेतेपद मिळवले, तर ते तिच्यासोबत गाणे गातील. गावस्करांनी आपले वचन पाळत हा खास गिटार भेट दिला.
जेमिमाने हसत सांगितले की, “मी सुनील सर आपले वचन कधी पूर्ण करतात याची वाट पाहत होते. त्यांनी मला अजिबात निराश केले नाही.” यावेळी तिने गंमतीने गावस्करांना विचारले की, हा बॅटच्या आकाराचा गिटार वाजवण्यासाठी आहे की फलंदाजीसाठी? त्यावर गावस्करांनी मिश्किल उत्तर देत सांगितले, “तू दोन्ही करू शकतेस.”
जेमिमाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “सुनील सरांनी आपले वचन पूर्ण केले आणि आम्ही आतापर्यंतच्या सर्वात कूल ‘बॅट-आर’सोबत जॅमिंग केली. हा क्षण खूप खास होता.”
उल्लेखनीय बाब म्हणजे सुनील गावस्कर आणि जेमिमा रोड्रिग्स दोघेही संगीतप्रेमी आहेत. जेमिमाला अनेकदा गाणी गाताना पाहिले गेले आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या क्रिकेटपटूंच्या सन्मान सोहळ्यातही तिने आपल्या गायनाने सर्वांची मने जिंकली होती.
दरम्यान, जेमिमा रोड्रिग्स प्रथमच महिला प्रीमियर लीगमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार म्हणून तिचा पहिला सामना शनिवारी मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे.







