टी२० विश्वचषक २०२६ दरम्यान अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबी याच्यावर आयसीसीने कारवाई करत मॅच फीच्या १५ टक्के दंडाची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात नबीने आयसीसीच्या आचारसंहितेचा लेव्हल १ भंग केल्याचे आढळून आले.
नबी यांना खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.४ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. याशिवाय त्यांच्या शिस्तीच्या नोंदीत एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला आहे. मागील २४ महिन्यांतील ही त्यांची पहिली चूक आहे.
वाद नेमका कशावरून झाला?
अफगाणिस्तानच्या डावातील १४व्या षटकाच्या सुरुवातीला हा प्रकार घडला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज लुंगी एनगिडीच्या मनगटावरील बँडबाबत नबी आणि पंचांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यानंतर पंचांनी त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवला.
नबी यांनी आपली चूक मान्य केली असून एमिरेट्स आयसीसी आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनलचे डेविड गिल्बर्ट यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.
या प्रकरणात ऑन-फील्ड पंच जयरामन मदनगोपाल आणि शरफुद्दौला इब्ने शाहिद, तिसरे पंच नितीन मेनन तसेच चौथे पंच के. एन. अनंथापद्मनाभन यांनी आरोप नोंदवले होते. लेव्हल १ उल्लंघनात अधिकृत ताकीद, कमाल ५० टक्के मॅच फी दंड किंवा एक-दोन डिमेरिट पॉइंटची तरतूद आहे.
दुहेरी सुपरओव्हरचा थरार
दरम्यान, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना अत्यंत रोमांचक ठरला. निर्धारित २० षटकांत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानही १९.४ षटकांत १८७ धावांवर बाद झाली आणि सामना सुपरओव्हरमध्ये गेला.
पहिल्या सुपरओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १७-१७ धावा केल्या. त्यामुळे सामना दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये पोहोचला. दक्षिण आफ्रिकेने २३ धावा केल्यानंतर अफगाणिस्तानसमोर २४ धावांचे आव्हान होते.
मात्र, दुसऱ्या सुपरओव्हरच्या पहिल्याच दोन चेंडूंमध्ये नबी शून्यावर बाद झाले. उरलेल्या चार चेंडूंवर २४ धावांची गरज असताना रहमानुल्लाह गुरबाजने केशव महाराजला सलग तीन षटकार ठोकत आशा जिवंत ठेवली. एक वाईडनंतर अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना गुरबाज बाद झाला आणि अफगाणिस्तानचा संघ हा थरारक सामना ४ धावांनी गमावून बसला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवानंतर अफगाणिस्तानची सुपर ८ फेरी गाठण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे.







