भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयोजित देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेची विजय हजारे ट्रॉफी (लिस्ट-ए फॉरमॅट) २०२५-२६ हंगामाची सुरुवात बुधवारी दणक्यात झाली. पहिल्याच दिवशी फलंदाजांनी वर्चस्व गाजवत तब्बल २२ शतके झळकावली.
शतक झळकावणाऱ्या प्रमुख फलंदाजांमध्ये मुंबईकडून रोहित शर्मा, दिल्लीकडून विराट कोहली, बिहारकडून वैभव सूर्यवंशी, झारखंडकडून ईशान किशन आणि कर्नाटककडून देवदत्त पड्डीकल यांचा समावेश आहे. मात्र ओडिशाच्या स्वास्तिक समलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वास्तिकने सौराष्ट्रविरुद्ध १६९ चेंडूंमध्ये २१२ धावांची अफलातून खेळी साकारली.
विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील ही खेळी चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली आहे. स्वास्तिक समल आणि संजू सॅमसन हे संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.
विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वैयक्तिक खेळीचा विक्रम तमिळनाडूच्या यष्टीरक्षक-फलंदाज एन जगदीशन याच्या नावावर आहे. जगदीशनने २१ नोव्हेंबर २०२२ रोजी अरुणाचल प्रदेशविरुद्ध १४१ चेंडूंमध्ये २७७ धावा केल्या होत्या.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलामीवीर पृथ्वी शॉ आहे. त्याने २०२१ साली पुडुचेरीविरुद्ध १५२ चेंडूंमध्ये नाबाद २२७ धावा झळकावल्या होत्या.
तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड आहे. त्याने २८ नोव्हेंबर २०२२ रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद २२० धावांची खेळी केली होती.
चौथ्या क्रमांकावर संजू सॅमसन आहे. त्याने १२ ऑक्टोबर २०१९ रोजी गोवाविरुद्ध १२९ चेंडूंमध्ये नाबाद २१२ धावा केल्या होत्या.
विजय हजारे ट्रॉफीच्या २०२५-२६ हंगामाचा पहिलाच दिवस अत्यंत धमाकेदार ठरला आहे. फलंदाज सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत असून, येत्या सामन्यांमध्ये या स्पर्धेतील मोठे वैयक्तिक विक्रम मोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.







