28.1 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरविशेषदादरच्या हॉकर्स प्लाझात अनधिकृत गाळ्यांचा विळखा?

दादरच्या हॉकर्स प्लाझात अनधिकृत गाळ्यांचा विळखा?

जनता मार्केटमधील बांधकामांवर प्रश्नचिन्ह; रस्ता रुंदीकरणात जागा गेलेल्यांना आता गाळे का?, पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Google News Follow

Related

दादरमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने सेनापती बापट मार्गावर उभारण्यात आलेल्या जनता मार्केट तथा हॉकर्स प्लाझामधील कथित बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तळमजल्यावरील गाळे, जिन्याखालील बांधकामे आणि इमारतीच्या बाहेरील जागेतील व्यावसायिक वापराबाबत संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, रस्ता रुंदीकरणात जागा गेलेल्या व्यक्तींना या इमारतीत गाळे देण्यात आल्याची माहिती एका पालिका अधिकाऱ्याने दिल्याने, हॉकर्स प्लाझा उभारल्यानंतर अनेक वर्षांनी हे वाटप का करण्यात आले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात दादरमधील फेरीवाल्यांची समस्या सोडवण्यासाठी हॉकर्स प्लाझाची उभारणी करण्यात आली होती. फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे कमी करणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश होता. मात्र, आज याच इमारतीतील गाळ्यांचे वाटप, बांधकामांना दिलेल्या परवानग्या आणि सामायिक जागांच्या वापराबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

जनता मार्केटमधील गाळ्याबाबत पालिका अधिकाऱ्याला विचारणा करण्यात आली असता, संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, या गाळ्याचे काम त्यांच्या कार्यकक्षेत येत नसून ते पालिकेच्या अभियंत्यांच्या कार्यकक्षेत येते. तसेच, रस्ता रुंदीकरणानंतर ज्यांच्या जागा गेल्या, त्यांना हे गाळे देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मात्र, हॉकर्स प्लाझा उभारून अनेक वर्षे लोटल्यानंतर रस्ता रुंदीकरणात जागा गमावलेल्या व्यक्तींना आता गाळे का देण्यात आले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या वाटपासाठी कोणते निकष निश्चित करण्यात आले होते? संबंधित व्यक्तींची पात्रता तपासण्यात आली होती का? गाळे देण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेण्यात आली होती का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे या वाटपाची कागदपत्रांसह चौकशी करण्याची मागणी होत आहे.

पीएपीच्या नावाखाली गाळे उभारल्याचा आरोप

जनता मार्केटच्या तळमजल्यासह पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कथितरीत्या अतिरिक्त गाळे उभारण्यात आल्याचे आरोप आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएपी प्रक्रियेच्या नावाखाली काही गाळ्यांचे बांधकाम किंवा वाटप झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

या गाळ्यांना परवानग्या आहेत का, त्यांचे वाटप कोणत्या निकषांनुसार करण्यात आले आणि त्यासंबंधीच्या नोंदी पालिकेकडे उपलब्ध आहेत का, असे प्रश्न हॉकर्स प्लाझामधील काही लोकांनी उपस्थित केले आहेत. गाळ्यांची संख्या, मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकाम यांची तुलना केल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.

जिन्याखालील जागेत दुकाने; सुरक्षिततेचा प्रश्न

हॉकर्स प्लाझाच्या तळमजल्यावर जिन्याखाली तसेच जिन्याच्या आजूबाजूच्या जागेत गाळे तयार करण्यात आल्याचे आरोप आहेत. काही ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचाही दावा केला जात आहे. इमारतीतील जिने, पॅसेज आणि सामायिक वापरासाठी राखीव असलेल्या जागांचा व्यावसायिक वापर करण्यास मंजुरी आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणीही केली जात आहे.

जिन्याखालील किंवा येण्या-जाण्याच्या मार्गावरील बांधकामांमुळे आपत्कालीन परिस्थितीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेच्या संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून अग्निसुरक्षा, येण्या-जाण्याचे मार्ग आणि मंजूर आराखड्याच्या अनुषंगाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

भिंतींमध्ये बदल करून दुकाने? परवानग्यांची चौकशी आवश्यक

इमारतीच्या बाहेरील बाजूस शटर बसवून दुकाने सुरू करण्यात आल्याचे, तसेच काही ठिकाणी भिंतींमध्ये बदल करून जागा तयार करण्यात आल्याचे आरोप आहेत. काही गाळ्यांचे वाटप, हस्तांतरण किंवा विक्री झाल्याची चर्चाही परिसरात असल्याचे सांगितले जाते. मात्र, या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.

अनधिकृत बांधकामे आढळल्यास संबंधितांना नियमानुसार नोटिसा देऊन कारवाई करावी. तसेच, या प्रकरणात अधिकारी किंवा अन्य व्यक्तींचा नियमबाह्य सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

पालिकेने खुलासा करावा!

जनता मार्केटमध्ये एकूण किती अधिकृत गाळे आहेत? रस्ता रुंदीकरणात जागा गेलेल्या व्यक्तींना किती गाळे देण्यात आले? हे वाटप नेमके कधी आणि कोणत्या निकषांनुसार झाले? जिन्याखाली, पॅसेजमध्ये आणि इमारतीच्या बाहेरील बाजूस असलेल्या बांधकामांना मंजुरी आहे का? या प्रश्नांची उत्तरांकडे दादरकरांचे लक्ष लागले आहे

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा