केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिकार टप्प्यात येईपर्यंत शांत होते. अगदी योग्य वेळी त्यांनी बंदुकीचा चाप ओढला. आपण फुगून बैलाएवढे झालेलो आहोत, असा समज झालेल्या बेडकांना त्यांनी जागा दाखवली. ‘१४ पक्ष एकत्र येऊन दिल्लीत ८ हजार लोक जमा करता आणि सरकार खाली खेचण्याची भाषा करता?’ या शब्दांत त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची लाज काढली. हा झाला पहिला दणका. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली. महानगरपालिकेचे कर्मचारी भटक्या कुत्र्यांना पकडून जसे गाडीत कोंबतात, अगदी तशीच! दोघांची रवानगी पाच दिवसांसाठी तिहार तुरुंगात करण्यात आली. अराजक माजवून देशाच्या जनतेला उपद्रव करणाऱ्यांवर बडगा उगारण्याची सुरूवात झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या दणदणीत विजयाबद्दल पत्रकारांशी संवाद साधताना जोरदार फटकेबाजी केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांनी त्यांची औकात दाखवून दिली. सणावाराच्या काळात रस्त्यावर उतरून जनजीवन विस्कळीत करण्याचा उपक्रम काही उपद्रवी गेल्या काही दिवसांत राबवत आहेत. आम्ही वाट्टेल ते करू आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत बसेल असा त्यांचा समज होता. जंतर मंतरवर करण्यात आलेले पहिले आंदोलन याला कारणीभूत होते. हे आंदोलन हाताळताना सरकारने दाखवलेल्या अनावश्यक सौम्यतेमुळे हे शेफारले होते. सरकार आपल्याला घाबरलेले आहे, असे त्यांना वाटत होते. ही मंडळी दया दाखवण्याच्या लायकीची नाहीत हे सरकारच्या लक्षात आल्यामुळे या सगळ्यांची उत्तरपूजा करायला सरकारने सुरूवात केली आहे.



