महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने आक्रमक रूप धारण केले असून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हवामानाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका, नद्या-नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त भाग, नदीकाठ आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
संसद, सरकार, सर्वोच्च न्यायालय म्हणजे बर्गर, पिझ्झा…
पेपरफुटीविरोधी कायदा लोकसभेत मंजूर
स्वस्त थायलंड टूरचे आमिष ठरले जीवावर! तीन भारतीयांचे अपहरण
कोळसा घोटाळा प्रकरणात दिवंगत डॉ. मनमोहन सिंग निर्दोष
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि सक्रिय झालेला मान्सून यामुळे राज्यभर पावसाची तीव्रता वाढली आहे. विशेषतः पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, पुण्यात जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने राज्यात एका बाजूला अतिवृष्टी तर दुसऱ्या बाजूला पावसाच्या असमान वितरणाचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.







