दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर गुरुवारी (३० जुलै) प्रदर्शित झाला. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४.१५ वाजता प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरचा श्रीराम, यशचा रावण आणि साई पल्लवीची सीता यांची पहिली विस्तृत झलक पाहायला मिळाली. भव्य व्हिज्युअल्स, प्रभावी व्हीएफएक्स आणि राम-रावण संघर्षाच्या भव्य मांडणीमुळे ट्रेलरला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सुमारे चार मिनिटांच्या ट्रेलरमध्ये श्रीराम आणि रावण यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमी उलगडण्यात आली आहे. श्रीरामाच्या शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वाची झलक रणबीर कपूरने साकारली असून, यशने साकारलेला रावण आक्रमक, करारी आणि प्रभावी दिसत आहे. साई पल्लवीची सीता, रवी दुबेचा लक्ष्मण आणि इतर महत्त्वाच्या पात्रांच्याही झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी जागतिक स्तरावरील सिनेमॅटिक अनुभव ठरेल, असा दावा केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून, संगीताची धुरा ऑस्कर विजेते हान्स झिमर आणि ए. आर. रहमान यांनी सांभाळली आहे. अत्याधुनिक VFX साठी DNEG स्टुडिओने काम केले असून हा चित्रपट IMAX फॉरमॅटमध्येही प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये रामायणातील अनेक महत्त्वाच्या घटनांची झलक पाहायला मिळते. प्रभू रामांच्या वनवासापूर्वीच्या घटनांपासून कथा सुरू होते. माता कैकयीने रामांना वनवासाची मागणी केल्याचे दाखवण्यात आले असून, पित्याचे वचन आणि मातृआज्ञेचा मान राखत प्रभू राम वनवासासाठी निघतात. त्यानंतर शूर्पणखा प्रसंग, सीतेचे हरण आणि पुढील घटनांची प्रभावी मांडणी ट्रेलरमध्ये करण्यात आली आहे.
ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी रणबीर कपूरच्या अभिनयाचे कौतुक केले असून सर्वाधिक चर्चा यशच्या रावणाच्या भूमिकेची सुरू आहे. त्याचा आक्रमक लूक, दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि संवादफेक यामुळे अनेकांनी ट्रेलरचा ‘शो-स्टीलर’ म्हणून त्याचे वर्णन केले आहे. ट्रेलरमधील भव्य व्हिज्युअल्स आणि युद्धदृश्यांनाही प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
हे ही वाचा:
ऍपल वॉच ठरलं ‘लाईफगार्ड’; मालक बेशुद्ध होताच स्वतःहून केला ९११ ला फोन
‘पाकिस्तानी काश्मीर’ नव्हे, पाकिस्तानव्याप्त काश्मीर!
ट्रम्प-झेलेन्स्की भेटीनंतर रशियाचा कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ला
जॉर्डनमधील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले
दरम्यान, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर ‘आदिपुरुष’ पुन्हा चर्चेत आला. अनेक नेटिझन्सनी दोन्ही चित्रपटांची तुलना करत ‘रामायण’च्या व्हिज्युअल्स, निर्मितीमूल्य आणि पात्रांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. ‘रामायण’ हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिला भाग दिवाळी २०२६ आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय पौराणिक महाकाव्याचे भव्य सिनेमॅटिक रूपांतर म्हणून या चित्रपटाकडे देशासह जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.







