आप, काँग्रेसने झोपडपट्टीवासियांना वर्षानुवर्षे मूर्ख बनवलं

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा आरोप

आप, काँग्रेसने झोपडपट्टीवासियांना वर्षानुवर्षे मूर्ख बनवलं

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रविवारी आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसवर झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना वर्षानुवर्षे फसवल्याचा आणि त्यांना मूलभूत सुविधा न पुरवल्याचा गंभीर आरोप करत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली. नेहरू कॅम्प, हैदरपूरमधील जेजे क्लस्टरमध्ये २४-सीटर जन सेवा शिबिराच्या (JSC) बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितलं की, नागरिकांना चांगल्या सेवा आणि सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि दिल्ली सरकार ती जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या की, मागील सरकारांनी झोपडपट्टीवासीयांना फसवलं आणि त्यांना भाजपा पक्षाला मत देऊ नका, असं सांगितलं. त्यांनी पुढे आरोप केला की, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शीला दीक्षित यांच्या सरकारांनी झोपडपट्टीवासीयांसाठी काहीच ठोस काम केलं नाही. केवळ निधीची घोषणा केली गेली, पण दिल्लीतील भाजपा सरकारने ७०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांवर काम सुरू केलं आहे. दिल्लीतील झोपडपट्ट्यांवर न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झालेल्या हटवणीच्या कारवाईवर आप पक्षाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना गुप्ता म्हणाल्या, “जेव्हा पर्यायी घरे दिली जातील, तेव्हाच झोपडपट्ट्या हटवण्यात येतील.”

हेही वाचा..

दिशा सालियानच्या मृत्यूला ५ वर्षे पूर्ण

बकरीदच्या दिवशी ६० वर्षीय दिली स्वतःचीच ‘कुर्बानी’.

हमीद – जयराम हे तर मनमोहन देसाईंचे अकबर-एन्थनी

दहा वर्षात भारतातील गरिबांची संख्या २७.१ टक्क्यावरून ५.३ टक्के

बारापुला नाल्याजवळील मद्रासी कॉलनीचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, “न्यायालयाने ही कॉलनी हटवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून नाल्याची स्वच्छता करणाऱ्या यंत्रांना प्रवेश मिळू शकेल. जर असं न झालं, तर दिल्लीला पुन्हा २०२३ सारख्या पूरस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. रेल्वे कॉलनीतील कारवाईबद्दल त्यांनी सांगितलं, “लोकांनी रेल्वे रुळांजवळच घरे बांधली आहेत. जर एखादी दुर्दैवी घटना घडली, जसं की कोणी रुळांखाली आल्याने मृत्यू झाला, तर जबाबदार कोण? आतिशी, अरविंद केजरीवाल की सौरभ भारद्वाज?”

झोपडपट्टीत राहणाऱ्या काही लोकांच्या वागणुकीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि सांगितलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः वजीरपूर झोपडपट्टीतील १,६७५ फ्लॅट दिले, पण जर लोक असं समजतील की त्यांनी फ्लॅट घेतले तरी ते झोपडपट्टीतच राहणार, तर हे चालणार नाही. क्षेत्रात सुविधा नसल्याबद्दल त्यांनी पूर्वीच्या सरकारांची टीका केली आणि म्हटलं की, “इथे ना गटारं होती, ना मुलांसाठी खेळायला मैदानं, आणि ना महिलांसाठी स्नानगृह किंवा शौचालयाची सोय होती.”

मुख्यमंत्री गुप्ता यांनी सांगितलं की, त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहांची सोय निश्चितपणे करतील. तसेच, त्यांनी घोषणा केली की त्यांची सरकार ५-६ स्नानगृहं आणि गटारं बांधेल, जेणेकरून लोकांना गैरसोयीला सामोरं जावं लागू नये. त्यांनी शेवटी सांगितलं की, “दिल्लीमध्ये देशभरातून लोक कामासाठी आले आहेत आणि सरकार त्यांच्यासाठी काम करत राहील.”

Exit mobile version