आयपीएल २०२६ हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) फ्रँचायझीनं मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांची KKR च्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बद्दलची अधिकृत घोषणा संघानं आपल्या सोशल मीडिया अकाउंट ‘X’ वर केली.
KKR च्या पोस्टमध्ये लिहिलं आहे –
“अभिषेक २०१८ पासून आमच्या टीम मॅनेजमेंटचा अविभाज्य भाग आहेत. मैदानावर आणि मैदानाबाहेर त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं आहे. क्रिकेटवरील त्यांची समज आणि खेळाडूंशी असलेला संवाद हेच आमच्या प्रगतीचं प्रमुख कारण आहे. आम्हाला अभिषेक नायर यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करताना आनंद होत आहे.”
अभिषेक नायर २०१८ पासून KKR सोबत कार्यरत आहेत. त्यांनी KKR अकॅडमीत युवा खेळाडूंना प्रशिक्षित केलं आणि २०२४ मध्ये गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील चॅम्पियन KKR टीममध्ये सहाय्यक कोच म्हणून काम पाहिलं.
गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर नायरलाही टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षकपद मिळालं होतं. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्यांना त्या पदावरून हटवलं गेलं आणि २०२५ मध्ये ते पुन्हा KKR मध्ये परतले. आता अखेर त्यांनाच मुख्य प्रशिक्षकपद मिळालं आहे.
KKR चा २०२५ चा हंगाम सामान्य गेला होता, त्यामुळे नायरच्या नेतृत्वाखाली टीमकडून मोठ्या पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
क्रिकेट क्षेत्रात नायर तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम मानले जातात. दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीतील सुधारणा देखील त्यांच्या मार्गदर्शनामुळे झाल्याचं अनेकांनी मान्य केलं आहे.







