अखिलेश यादव यांचे जवळचे आणि समाजवादी पक्षाचे माजी एमएलसी वासुदेव यादव यांना अटक करण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात वाराणसी पोलिसांनी वासुदेव यादव यांना अटक केली. प्रयागराज शहरातील जॉर्ज टाउन परिसरातील निवासस्थानी मंगळवारी (४ मार्च) छापा टाकण्यात आला. या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली.
वासुदेव यादव यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात वाराणसी न्यायालयाने माजी एमएलसी वासुदेव यादव यांनाही समन्स बजावले होते. अनेक वेळा समन्स बजावूनही वासुदेव न्यायालयात हजर राहिले नाहीत. यानंतर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.
या अजामीनपात्र वॉरंटच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत प्रयागराजमध्ये छापा टाकला. शिक्षण विभागात महत्त्वाची पदे भूषवताना वासुदेव यादव यांनी उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यूपी बोर्डाचे सचिव आणि यूपीच्या माध्यमिक शिक्षण विभागात संचालक अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.
हे ही वाचा :
‘फिट इंडिया मीट’मधून तळागाळातील खेळाडूंना पारखण्याची संधी!
उत्तर प्रदेशमध्ये ८ वर्षांत एकही नवा कर लावला नाही
हाकलेपर्यंत मुंडे यांनी वाट पाहिली…
युक्रेनची लष्करी मदत थांबवणे म्हणजे पुतीन यांची मदत करणे
२०१७ मध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार स्थापन झाल्यानंतर १२ सप्टेंबर रोजी वासुदेव यादव यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले होते. वासुदेव यादव यांची मुलगी निधी यादव या समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. वासुदेव यादव हे मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांचे खूप जवळचे मानले जात होते. यादव कुटुंबाशी असलेल्या जवळीकतेमुळे त्यांना समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता.दरम्यान, वासुदेव यादव यांच्या अटकेनंतर कुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांनी मौन बाळगले आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या काहीही बोलण्यास तयार नाही.