काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तानला प्रत्युत्तर का दिलं नव्हतं, यावर त्यांनी भाष्य केले आहे. जागतिक दबाव आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेमुळे भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही, असं चिदंबरम यांनी म्हटलं. चिदंबरम म्हणाले, प्रत्युत्तर देण्याचा विचार माझ्या मनात आला होता. परंतु, सरकारने लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपा नेत्यांनी टीका केली आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशासह जगाला हादरवून सोडले होते. १७५ जणांचा बळी घेणाऱ्या या दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवसांनंतर केंद्रीय गृहमंत्रीपदाची सूत्रे चिदंबरम यांनी हाती घेतली होती. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, संपूर्ण जग दिल्लीला सांगत होते की, युद्ध सुरू करू नका. पुढे ते म्हणाले की, “मी पदभार स्वीकारल्यानंतर दोन- तीन दिवसांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री असलेल्या कॉन्डोलीजा राईस मला आणि तत्कालीन पंतप्रधानांना भेटण्यासाठी आल्या. तेव्हा त्या म्हणाल्या कृपया प्रतिसाद देऊ नका. यावर मी म्हणालो की हा निर्णय सरकार घेईल. पण, माझ्या मनात या हल्ल्याचा सूड म्हणून काही कृती करावी असे आले होते.”
चिदंबरम पुढे म्हणाले की, राईस यांनी पंतप्रधान आणि महत्त्वाच्या इतर लोकांशी प्रतिसादाबद्दल चर्चा केली. हल्ला सुरू असतानाही पंतप्रधानांनी यावर चर्चा केली होती. परराष्ट्र मंत्रालय आणि आयएफएस यांच्या प्रभावाखाली हा निष्कर्ष निघाला की आपण परिस्थितीवर प्रतिक्रिया देऊ नये, असे त्यांनी सांगितले.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित १० पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकसह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. मुंबई पोलिसांनी कसाब या दहशतवाद्याला पकडले. पुढे कसाबला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांच्या या कबुलीनंतर भाजपाने त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, १७ वर्षांनंतर माजी गृहमंत्री चिदंबरम यांनी तेच कबूल केले जे देशाला आधीच माहित आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर परकीय शक्तींच्या अधीन होऊन तत्कालीन सरकारने परिस्थिती नीट हाताळली नाही.
After 17 years, Chidambaram, Former Home Minister admits what the nation knew — 26/11 was mishandled due to pressure from foreign powers. Too little, too late.#CongressFailedNationalSecurity pic.twitter.com/bbWWM5X5gu
— Pralhad Joshi (@JoshiPralhad) September 29, 2025
हे ही वाचा :
दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे भासवून ७० लाखांची फसवणूक
लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड
बरेली हिंसाचार: मुख्य कट रचणाऱ्यांपैकी एक नदीम खान पोलिसांच्या ताब्यात!
लेहमधील अशांततेचा लडाख पर्यटनाला फटका!
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसवर टीकास्त्र डागले. मुंबई हल्ल्यानंतर चिदंबरम सुरुवातीला गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारण्यास कचरत होते, त्यांना पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाईची इच्छा होती, परंतु इतरांचा विजय झाला. त्यांनी काही सवालही उपस्थित केले आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी किंवा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या हालचाली रोखल्या होत्या का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी असा दावा केला की यूपीए सरकार कॉन्डोलिझा राईसच्या प्रभावाखाली काम करत असल्याचे दिसून आले. यूपीए सरकार त्यांच्याकडून आदेश का घेत होते? सोनिया गांधी गृहमंत्र्यांवर का मात करत होत्या? असे कठोर सवाल पूनावाला यांनी विचारले आहेत. त्यांनी पुढे काँग्रेसवर मुंबई हल्ला आणि २००७ च्या समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटांवर पाकिस्तानला “क्लीन चिट” देण्याचा आरोप केला आणि त्याचबरोबर हिंदू दहशतवाद कथेला प्रोत्साहन दिल्याबद्दल टीका केली आहे. वारंवार दहशतवादी हल्ले होऊनही पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) दर्जा दिल्याबद्दल त्यांनी यूपीए सरकारवर टीका केली आणि आरोप केला की काँग्रेस इस्लामाबादविरुद्ध नवी दिल्लीच्या लष्करी कारवाईवर अजूनही शंका घेत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे कौतुकही त्यांनी केलेले नाही, अशी टीका शहजाद पूनावाला यांनी केली आहे.







