उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात तब्बल १७ दिवस अडकल्यानंतर मंगळवारी सुटका झालेले सर्व ४१ कामगार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असून ते घरी परत जाऊ शकतात, असा निर्वाळा हृषिकेश येथील एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ४० कामगारांना घरी सोडण्यात आले आहे. तथापि, उत्तराखंडमधील एक कामगार बोगदा कोसळण्याशी संबंधित नसलेल्या जन्मजात वैद्यकीय स्थितीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातच आहे.
एम्स-हृषिकेशचे वैद्यकीय अधीक्षक प्रा. डॉ आर. बी. कालिया, जनरल मेडिसिनचे प्रमुख प्रा. विभाग, रुग्णालय प्रशासनाचे प्रा. डॉ. रविकांत आणि डॉ. नरेंद्र कुमार यांनी गुरुवारी आरोग्य बुलेटिन प्रसिद्ध करून कामगारांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ‘प्राथमिक तपासणीअंती, यापैकी एकाही कामगाराला दुखापत झाल्याचे आढळून आले नाही. त्यांना आधीपासूनच असलेल्या आरोग्यबाबींशी निगडीत सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच, त्यांची रक्त तपासणी, मूत्रपिंड, ईसीजी अहवाल, यकृत कार्यक्षम चाचणी आणि एक्स-रे काढण्यात आले. सर्व कामगार शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत,’ असे या डॉक्टरांनी जाहीर केले.
हे ही वाचा:
९७ तेजस विमाने, १५० हुन अधिक लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस सरकारने दिली मंजुरी!
दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?
योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग
समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही
रुग्णालयातच उपचारासाठी राहिलेल्या उत्तराखंडच्या रुग्णाबद्दल प्रा. डॉ. रविकांत यांनी माहिती दिली. ‘या कामगाराला अॅट्रिअल सेप्टल डिफेक्ट असल्याचे निदान झाले आहे. ही शारीरिक स्थिती जन्मजातच असते. त्याची शारीरिक स्थिती सामान्य आहे. पुढील तपासासाठी त्याला आपत्कालीन विभागातून हृदयरोग विभागात हलवण्यात आले आहे. हा विकार बोगदा कोसळण्याशी संबंधित नाही,’ असे ते म्हणाले.रुग्णालय प्रशासनाने ते सर्व शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगत त्यांना घरी जाण्याची मुभा दिली. ही माहिती कामगारांच्या संबंधित राज्यांना अधिकृतपणे देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुमारे तीन आठवड्यांनंतर बोगद्यातून सुटका करण्यात आल्यामुळे या कामगारांच्या मानसिक स्थितीत बदल होऊ शकतो. त्यामुळे त्यांना दोन आठवड्यांनंतर जवळच्या आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगण्यात आले आहे. मंगळवारी या कामगारांची सुटका केल्यानंतर त्यांना येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात रात्रभर वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. बुधवारी त्यांची सर्वप्रकारे कसून आरोग्य तपासणी करण्यासाठी विमानाने एम्स-हृषिकेश येथे नेण्यात आले. यातील १५ कामगार झारखंडमधील असून अन्य आठ उत्तर प्रदेशातील, ओडिशा आणि बिहारमधील प्रत्येकी पाच, पश्चिम बंगालमधील तीन, आसाम आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी दोन आणि हिमाचल प्रदेशमधील एका कामगार आहे.







