28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरसंपादकीयदत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?

दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?

निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा मुस्लिमधार्जिण्या राजकारणाला जोर येतो आहे

Google News Follow

Related

महाराष्ट्रात अनेकांना दंगलीचे डोहाळे लागले आहेत. दंगलींची ताजी उबळ वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना आली आहे. त्यांनी दंगलींचा मुहूर्तही जाहीर केला आहे. ३ डिसेंबर नंतर महाराष्ट्रात दंगली होतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार मुख्यमंत्र्यांना शिव्या घालणाऱ्याला अटक करते. औरंगजेब आणि टिपूच्या आरत्या ओवाळणाऱ्यांवर मात्र कारवाई होत नाही.

 

केंद्र सरकारकडे आयबी, रिसर्च एण्ड एनालिसिस विंग अशा शक्तीशाली आणि प्रभावी गुप्तचर संस्था आहेत. त्यांचा पसारा मोठा आहे. त्यांना नसलेली माहिती प्रकाश आंबेडकरांपर्यंत येते. ही माहिती ते पोलिसांना न सांगता मीडियाकडे जाहीर करतात. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत दंगलींच्या भविष्यवाण्या वेगवेगळ्या नेत्यांनी केलेल्या आहेत. संजय राऊत वारंवार सांगत होते. उद्धव ठाकरे यांनीही राम मंदिराच्या उद्घाटनाला देशातील लोकांना बोलावले जाईल. ते परतताना जाळपोळीच्या घटना होतील, अशी भविष्यवाणी केली होती. राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. केंद्र सरकारने तशी घोषणा केली आहे. म्हणजे जाळपोळीच्या घटना याच्याच आसपास होतील असे भाकीत ठाकरेंनी केले आहे.

 

प्रकाश आंबेडकरांनी एक महिना आधीच म्हणजे डिसेंबरमध्ये दंगली होतील असे विधान केले आहे. दंगलीपासून सावधान राहण्याचे आवाहन त्यांनी ओबीसी आणि मुस्लिमांना केले आहे. आंबेडकर जाणीवपूर्वक गेल्या काही काळात अशा प्रकारची विधाने करतायत की ते सतत प्रकाश झोतात राहतील. ते आधी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाले. त्यांनी टिपू सुलतानच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा मुस्लिमधार्जिण्या राजकारणाला जोर येतो आहे. बिहारमध्ये जन्माष्टमी, रक्षाबंधन अशा हिंदू सणांच्या सुट्ट्या कमी करून ईद आणि मोहरमच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. सुट्ट्यांची संख्या वाढवून मुस्लिमांचे भले होणार नाही. तरीही आमच्या पेक्षा मोठे चाटुकार होऊ शकत नाहीत हे दाखवण्याची राजकारण्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

 

प्रकाश आंबेडकर तेच करतायत. इतिहासात हिंदू समाजावर वरवंटा चावलण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या आरत्या ओवाळण्याचे काम करतायत. हिंदवी स्वराज्याची पाळंमुळं उखडून टाकण्यासाठी तब्बल २७ वर्षे महाराष्ट्रात तळ ठोकून बसलेल्या औंरग्याच्या आरत्या ओवाळल्यामुळे हिंदू समाज दुखावला तर काय, मुस्लिम तर खूष होतील. टिपू हा तर दक्षिणेतील औंरगजेब. हिंदूंचे शिरकाण, हिंदू महिलांवर अत्याचार, मंदिरांची तोडफोड हे सगळे गुन्हे याच्या नावावर आहेत. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा. हिंदू इतिहास पुरुषांच्या समशेरीने या दोघांची जिरवली. हिंदूंच्या कत्तलींचा वचपा काढला. परंतु आंबेडकर मात्र यांना लोटांगण घालतायत. मतांसाठी हिंदूंना अपमानित करण्याचे धंदे करायचे आणि सरकारला आव्हान द्यायचे की मला अटक करून दाखवा.

 

या आंबेडकरांसाठी ठाकरेंच्या मातोश्रीवर लाल गालिचे अंथरले जातात. ठाकरेंच्या पक्षाने त्यांच्यासोबत युतीची घोषणा केली आहे. शिवसेना-भाजपाचे हिंदुत्ववादी सरकार राज्यात आहे. परंतु औंरंग्यासमोर सजदा करणारा हा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आपले मित्र असल्याचा दावा करतो. जर औंरंग्या आणि टिपू समोर झुकणारे प्रकाश आंबेडकर जर मुख्यमंत्र्यांना चालतात, तर मग एमआय़एमच्या इम्तियाज जलीलने काय पाप केले आहे? तोही औरंग्यासमोर झुकतो हाच राग आहे ना?

हे ही वाचा:

युद्धबंदी दरम्यान जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला, गोळीबारात तीन इस्रायली ठार!

९७ तेजस विमाने, १५० हुन अधिक लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस सरकारने दिली मंजुरी!

‘भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी चार अंतराळवीरांना प्रशिक्षण’

आरेतून प्रवास करायचा असेल तर भरावा लागेल ‘ग्रीन टोल’!

प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकरांचे कर्तृत्व इथे सुरू होते आणि इथेच संपते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आंबेडकरांना अटक करा अशी मागणी केली आहे. एखाद्या होणाऱ्या गुन्ह्याची माहिती लपवणे हाही गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु राज्य सरकार असे धाडस दाखवेल अशी शक्यता कमी.

 

मोडीत निघालेल्या एखाद्या दत्ता दळवीना अटक करून सरकारचा वचक निर्माण होणार आहे का? दत्ता दळवी हे माजी महापौर आहेत. सध्या त्यांचे राजकीय वजन तोळामासाच. दळवींना अटक केली काय न केली काय? फरक काय पडणार होता? उलट अटक करून त्यांचे राजकीय वजन वाढवण्याचे काम सरकारने केले. दळवींवर कारवाई करणारे सरकार हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्यांना हात लावण्याची हिंमत दाखवणार आहे का? मुख्यमंत्र्यांना शिव्या घालणे हा अपराध आहेच, परंतु औरंगजेब आणि टिपू सुलतानचे महिमामंडन करण्यापेक्षा मोठा अपराध नाही. औरंगजेबाचा डीपी ठेवणे हा गुन्हा असेल तर त्याच्या आरत्या ओवाळणे हा गुन्हा नाही?

 

राज्यातील सध्याची अनागोंदी पाहून अनेकदा वाटते की, महाराष्ट्रात एखादा योगी का निर्माण होत नाही. विकास दुबे या गँगस्टरला ठोकताना ब्राह्मण नाराज होतील असा विचार त्यांनी केला नाही. अतिक अहमदचा गेम करताना मुस्लिम मतांची चिंता केली नाही. कारण दुबे काय किंवा अतिक काय हे त्या समाजाचे प्रतिनिधी नाहीत. हे राहिले काय गेले काय, लोकांना फरक पडणार नाही, याबाबत त्यांना खात्री होती. त्यामुळे सरकारने खमकेपणा दाखवावा. शंभर गोष्टींबाबत तडजोड करा, पण हिंदुत्वाबाबत नको. अशी त़डजोड केली नाही म्हणून योगी आदित्यनाथ यांना जनतेने डोक्यावर घेतले, महाराष्ट्रातील राजकारण्यांना याचा विसरू पडू नये.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा