केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अलीकडेच झालेल्या भीषण पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय जम्मू विभागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की गृहमंत्री अमित शहा नुकत्याच झालेल्या पुरामुळे झालेल्या हानीचे परीक्षण करण्यासाठी जम्मूचा दौरा करतील. ते रियासी जिल्ह्यातील माता वैष्णोदेवी मंदिराच्या आधार छावणी कटरा तसेच किश्तवाडलाही भेट देतील.
या दौऱ्याचा उद्देश अलीकडील पुरामुळे झालेल्या हानीचे मूल्यमापन हा असेल, ज्यात सुमारे १३० तीर्थयात्रेकरूंंसह अंदाजे १५० लोकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहमंत्री ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी जम्मू येथे पोहोचतील व १ सप्टेंबरच्या संध्याकाळी केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीत परततील. या दौर्यात त्यांच्या सोबत गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांची टीमही असेल. ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी ते जम्मू प्रदेशातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी राजभवनात उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.
हेही वाचा..
ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण संविधानाविरुद्ध, अधिकारांचा गैरवापर…
पंतप्रधान मोदींचा जपानच्या पंतप्रधानांसोबत बुलेट ट्रेन प्रवास!
भाजपा आमदाराकडून महुआ मोईत्रा यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल!
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर!
सूत्रांनी सांगितले, “उपराज्यपाल मनोज सिन्हा या बैठकीत सहभागी होतील व गृहमंत्र्यांना प्रदेशातील हानी, मदत/बचाव कार्य आणि पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीबाबत माहिती देतील. मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे रस्ते, पूल, घरे, दुकाने, शेतीपिके यासह नागरी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. निवासी भागांत पाणी शिरले असून माता वैष्णोदेवी यात्रा व मचैल माता यात्रा विस्कळीत झाली आहे. गृहमंत्री अमित शहा माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाताना अर्धकुंवारी येथे जखमी झालेल्या तीर्थयात्रेकरूंना कटरा शहरातील नारायण रुग्णालयात भेटतील.
यानंतर ते किश्तवाड जिल्ह्यातील चशोती येथे झालेल्या ढगफुटी आणि त्यानंतर अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे हवाई मूल्यमापन करतील. येथे १४ ऑगस्टला झालेल्या भीषण ढगफुटीत ६५ लोकांचा मृत्यू झाला होता व १०० हून अधिक जखमी झाले होते, ज्यांपैकी बहुतांश तीर्थयात्री होते. ते जम्मू जिल्ह्यातील काही ठिकाणीही भेट देतील, जिथे पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री १ सप्टेंबरच्या संध्याकाळी नवी दिल्लीला परततील. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की केंद्र सरकार येत्या काही दिवसांत बाधित नागरिक आणि नुकसानग्रस्त पायाभूत सुविधांसाठी मोठ्या मदत पॅकेजची घोषणा करू शकते.







