बदलापूर पुन्हा एकदा हादरले आहे. निष्पाप चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, ही घटना समाजातील माणुसकीला काळिमा फासणारी ठरली आहे. अजून आयुष्याचा अर्थही नीटसा न उमगलेल्या लहानग्या मुलीवर झालेला हा अत्याचार प्रत्येक संवेदनशील मन हेलावून टाकणारा आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा बदलापूर पश्चिमेतील एका नामांकित शाळेचा व्हॅन चालक आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घटनेनंतर सुरुवातीला शाळा प्रशासनाने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात आरोपीने शाळेच्या व्हॅनमध्येच चिमुरडीवर अत्याचार करून तिला मारहाण केल्याचे उघड झाले आहे.
हे ही वाचा:
कठुआमध्ये जैशचा कुख्यात आतंकवादी मोहम्मद उस्मान ठार
कोरोना विषाणूची सुरुवात वुहानमधूनच
जपानच्या पंतप्रधानांनी अवघ्या तीन महिन्यांत संसद केली बरखास्त
शशी थरूर काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारणार
सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र शारीरिक जखमांपेक्षा मानसिक धक्का अधिक गंभीर असल्याने त्या आघातातून सावरण्यास वेळ लागणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात कठोर कलमांसह POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
विशेष म्हणजे, ही बदलापूरमधील पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी आदर्श विद्यालयातील अत्याचार प्रकरणानेही संपूर्ण राज्य हादरले होते. त्या प्रकरणात मुख्य आरोपीचा एन्काऊंटर झाला असला, तरी इतर आरोपी आजही जामिनावर मोकाट फिरत असल्याची भावना नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे.
या पार्श्वभूमीवर बदलापूरमधील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक आई-वडिलांच्या मनात “आपली मुले खरंच सुरक्षित आहेत का?” हा प्रश्न सतावत आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, तोपर्यंत समाजाच्या जखमा भरून येणार नाहीत, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.







