चिंबई…मुंबईसह आसपासच्या सर्व शहरात मुसळधार, पालघर, वसई, विरार पाण्यात

मुसळधार पावसामुळे मुंबई ठप्प; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

चिंबई…मुंबईसह आसपासच्या सर्व शहरात मुसळधार, पालघर, वसई, विरार पाण्यात

शनिवारच्या दिवशी मुंबईसह आजुबाजुच्या सर्व शहरे, उपनगरांना पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. हवामान खात्याने ४ ते ६ जुलैच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्याप्रमाणे शनिवारी पावसाचा कहर पाहायला मिळाला. सर्वदूर पावसाचे थैमान पाहायला मिळाले. मुंबईसह पालघर, वसई, विरार, नालासोपारा, मध्य मुंबईतील उपनगरे, नवी मुंबई सगळ्यांना पावसाने भरपूर झोडपून काढले.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेवरही पावसाचा मोठा परिणाम झाला. काहीठिकाणी ट्रॅकवर पाणी जमल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली. मध्ये रेल्वे, पश्चिम रेल्वे उशिराने धावत होत्या. त्यामुळे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दा पाहायला मिळाली.  दिवसभर पाऊस पडत असल्यामुळे आणि जुलैचा महिना असल्यामुळे २००५मधील २६ जुलैची आठवण पुन्हा एकदा होऊ लागली.

भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबई महापालिकेने शनिवारी दुपारच्या सत्रासाठी शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.

मुसळधार पावसामुळे अंधेरी, कुर्ला, साकीनाका, चेंबूर, सांताक्रूझ, गोरेगाव आणि पवईसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला, तसेच खासगी वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक रस्ते हे पूर्णपणे जलमय झाले. त्यामुळे घरे, दुकानातही पाणी शिरले. वसई, विरार, पालघर, नालासोपारा येथे पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि लोकांना बाहेर पडणे मुश्कील झाले.

वसईतील मधुबन परिसरात २५ जणांना वाचवले

वसईच्या मधुबनमध्ये मुसळधार पावसाने कंबरेच्या वर पाणी भरले त्यामुळे अनेक लोक अडकले होते. स्थानिकांनी दोरीचा वापर करून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.

रेल्वे सेवांवर परिणाम

पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा आणि विरार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाने गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याचे सांगितले असले, तरी प्रवाशांनी काही काळ रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याची तक्रार केली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग (मेन लाईन) आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. विक्रोळी येथे रुळांवर पाणी साचणे आणि कमी दृश्यमानता यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “आतापर्यंत कोणतीही असामान्य परिस्थिती नाही. गाड्या कमी वेगाने धावत असून विक्रोळीजवळ विशेष दक्षतेचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

भांडूपमध्ये रस्ता खचला; टेम्पो, झाड गेले वाहून

पी. व्ही. सिंधूचा सुवर्णप्रवास

राजस्थानी परंपरेच्या नेत्रसुखद विमानतळाचे नवे टर्मिनल जोधपूरमध्ये

वैभव सूर्यवंशीवर दबाव टाकू नका!

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश तसेच पुणे-नाशिक पट्ट्यातील नागरिकांना ६ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा लक्षात घेऊन अधिकृत हवामान सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले.

जून महिन्यात पावसाची मोठी तूट जाणवली होती मात्र आता पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

मुंबईत अनेक भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

महापालिकेच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहरातील अनेक भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

पश्चिम उपनगरांमध्ये:

वांद्रे (एच-पश्चिम विभाग कार्यालय) – १५०.६ मिमी

सुपारी टँक, वांद्रे – १४६ मिमी

पाली-चिंबई, वांद्रे – १४३.२ मिमी

दक्षिण मुंबईत:

परळ – १४१.८ मिमी

माटुंगा-दादर – १३५.२ मिमी

फोर्ट – १२०.८ मिमी

वडाळा – ११८.३ मिमी

लोअर परळ – ११८ मिमी

पूर्व उपनगरांमध्ये:

विक्रोळी – १४३ मिमी

घाटकोपर – १३६.४ मिमी

मानखुर्द – १३४.२ मिमी

चेंबूर – १२७.६ मिमी

महाराष्ट्र नगर, मानखुर्द – १२४ मिमी

२४ तासांत दक्षिण मुंबईत सरासरी ९९ मिमी, पूर्व उपनगरांत ९८ मिमी, तर पश्चिम उपनगरांत ९४ मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत शहरात सरासरी २८ मिमी, पूर्व उपनगरांत ९६ मिमी आणि पश्चिम उपनगरांत ८३ मिमी पाऊस झाला.

रस्ते जलमय; वाहतुकीवर परिणाम

मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले. साचलेले पाणी काढण्यासाठी महापालिकेच्या पथकांना तैनात करण्यात आले. अंधेरी सबवे वाहनांसाठी बंद करण्यात आला. तसेच साकीनाका, चांदिवली आणि विलेपार्ले येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली.

चेंबूर, अंधेरी आणि विक्रोळीतील पाण्याखाली गेलेल्या अनेक रस्त्यांवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद केली आणि वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला.

झाडे पडण्याच्या ६४ घटना; इमारती कोसळण्याच्या ८ घटना

महापालिकेच्या माहितीनुसार, शहरात झाडे पडण्याच्या ६४ घटना घडल्या. त्यापैकी १८ घटना पूर्व उपनगरात आणि ३६ घटना पश्चिम उपनगरात नोंदविण्यात आल्या. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय, घर किंवा भिंत कोसळण्याच्या ८ घटना घडल्या.

भायखळ्यातील बनेवाडी येथे दोन मजली इमारत कोसळल्याने दोन पुरुष आणि एक महिला जखमी झाले. त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भांडुपमधील सोनापूर परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाजवळ रस्ता खचल्याने एक वाहन खड्ड्यात अडकले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बेस्टचे मार्ग बदलले

पाणी साचल्यामुळे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने सहा बसमार्गांमध्ये बदल केले. त्यापैकी पाच मार्ग पश्चिम उपनगरांतील आणि एक मार्ग पूर्व उपनगरातील आहे.

दुपारच्या सत्रासाठी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

हवामान खात्याने मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर महापालिकेने शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दुपारच्या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली. महापालिकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “प्रादेशिक हवामान केंद्राने ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस, वादळी वारे आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला आहे.” ते पुढे म्हणाले, “जड पाऊस आणि वादळामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शक्य असल्यास नागरिकांनी प्रवास टाळावा. अधिकृत सूचनांचे पालन करूनच घराबाहेर पडावे.”

ठाणे आणि पालघरमध्येही पावसाचा तडाखा

शेजारील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आणि अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शनिवारी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० या कालावधीत ठाणे शहरात ६५.७९ मिमी, तर पालघर जिल्ह्यात ९७.७० मिमी पावसाची नोंद झाली.

Exit mobile version