राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत समोर आलेल्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. बारामतीत झालेल्या विमान अपघाताची बातमी पसरताच राजकीय, सामाजिक आणि कलाक्षेत्रातून शोकाकुल प्रतिक्रिया उमटू लागल्या. या सगळ्यात बिग बॉस मराठी फेम आणि पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याची प्रतिक्रिया मात्र प्रत्येकाचं मन हेलावून टाकणारी ठरली आहे.
सूरजसाठी अजित पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर त्याच्या आयुष्याला नवी दिशा देणारे वडीलधारे आधार होते. त्यामुळेच या बातमीनं सूरजवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत सूरजनं आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत.
“मित्रांनो माझा देव चोरला आज…
मला अजिबात विश्वास बसत नाही की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…
माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी सोन्यासारखं घर बांधून दिलं…
माझी काळजी घेतली… मला नवीन आयुष्य दिलं…”
असं म्हणत सूरजने आपलं दुःख शब्दांत मांडलं आहे.
“अजित दादांसारखा देवमाणूस या जगात नाही.
माझ्या आई-आप्पांनंतर अजित दादानं माझ्यासाठी इतकं केलं.
मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात जपून ठेवेन,”
असं म्हणत सूरजनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


सूरजला मिळालं हक्काचं घर, बदललं आयुष्य
बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सूरज चव्हाण हा रील स्टार म्हणून ओळखला जातो. बिग बॉस मराठी ५ चा विजेता ठरल्यानंतर अजित पवारांनी त्याचं मनापासून कौतुक केलं होतं. त्याचवेळी त्यांनी सूरजला स्वतःचं हक्काचं घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं. विशेष म्हणजे वर्षभराच्या आत त्यांनी आपला शब्द पाळत सूरजसाठी घर उभारलं.
या घराच्या बांधकामाकडे अजित पवारांनी स्वतः लक्ष दिलं होतं. कामाची पाहणी केली होती. काही महिन्यांपूर्वी सूरज आपल्या हक्काच्या घरात राहायला गेला. मात्र घर पूर्ण झाल्यानंतर अजित पवारांना त्या घराला भेट देता आली नाही, ही खंत सूरजच्या शब्दांतून स्पष्टपणे जाणवते.







