भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मतदार यादीतील अनियमिततेबाबत खोटे आरोप केल्याचा ठपका ठेवला आहे. एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांचा खरपूस समाचार घेत, भंडारी यांनी त्यांना हेतुपुरस्सर दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचे म्हटले आहे.
प्रदीप भंडारी म्हणाले की, “राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत ‘आदित्य श्रीवास्तव’ नावाच्या एका काल्पनिक व्यक्तीचा उल्लेख केला, जो महाराष्ट्रात कुठेही अस्तित्वात नाही.”
तसेच त्यांनी राहुल गांधी यांचा कर्नाटकच्या महादेवपूरा विधानसभा मतदारसंघासंदर्भातील दावा फेटाळून लावला. राहुल गांधी यांनी महादेवपूरामध्ये भाजपला फक्त एकच जागा मिळाल्याचा दावा केला होता, मात्र भंडारींनी स्पष्ट केले की, भाजप तिथे २००९ पासून सलग चार जागांवर विजय मिळवत आहे.
भंडारी पुढे म्हणाले, “राफेल प्रकरण असो, चीनबाबतचे आरोप असोत किंवा निवडणूक आयोगावरच्या टीका – राहुल गांधी सातत्याने चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यांचे हे वर्तन बालिश असून, त्यांच्या आजूबाजचे लोक त्यांच्या अपयशाचं खापर ईव्हीएम, मतदार यादी, किंवा अन्य बाबींवर फोडत आहेत.”
लोकशाहीला हानी पोहोचवणारे आरोप
प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावरही टीका केली. “राहुल आणि तेजस्वीने एकमेकांशी आधी चर्चा करायला हवी होती. त्यांनी केलेले खोटे आरोप आणि पत्रकार परिषदा लोकशाही प्रक्रियेवरच संशय निर्माण करणाऱ्या आहेत,” असे ते म्हणाले.
तेजस्वी यादव यांनी बनावट मतदार ओळखपत्रांचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, याची आठवण करून देत भंडारी म्हणाले की, “आयोगाने तेजस्वींना यासाठी नोटीसही पाठवली आहे. राहुल गांधी यांनी एका मतदार ओळखपत्रावर तिघांची नोंदणी झाल्याचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात तेजस्वी यादव यांच्याच नावावर दोन मतदार ओळखपत्रं असल्याची बाब समोर आली आहे.”







