तब्बल ३५ वर्षांनंतर सरला भट अत्याचार, हत्या प्रकरणात यासिन मलिकविरोधात आरोपपत्र

अपहरण, अत्याचार करून करण्यात आली होती हत्या

तब्बल ३५ वर्षांनंतर सरला भट अत्याचार, हत्या प्रकरणात यासिन मलिकविरोधात आरोपपत्र

काश्मिरी पंडित परिचारिका सरला भट यांच्या अपहरण, बलात्कार, अमानुष छळ आणि हत्येच्या तब्बल ३५ वर्षांनंतर, जम्मू-काश्मीर स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी श्रीनगरमधील विशेष न्यायालयात ७३७ पानी आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे. या आरोपपत्रात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) प्रमुख मोहम्मद यासीन मलिक आणि इतर आरोपींची नावे नमूद करण्यात आली आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, तपासात तत्कालीन जेकेएलएफचे मुख्य कमांडर मोहम्मद यासीन मलिक, तसेच खुर्शीद अहमद चाळकू, अब्दुल हमीद शेख, मोहम्मद युसूफ सोफी उर्फ इद्रीस आणि गुलाम मोहम्मद टपलू यांचा सरला भट यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्येच्या कटात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

यापैकी अब्दुल हमीद शेख, मोहम्मद युसूफ सोफी उर्फ इद्रीस आणि गुलाम मोहम्मद टपलू यांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद यासीन मलिक सध्या अन्य एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, गोळी झाडणारा मुख्य आरोपी खुर्शीद अहमद चालकू हा पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये पळून गेल्याचा संशय असून, त्याच्याविरुद्ध फरार आरोपी घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२०२४ मध्ये एसआयएकडे तपास वर्ग

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या आदेशानुसार १८ मार्च २०२४ रोजी हे प्रकरण एसआयएकडे वर्ग करण्यात आले. दीर्घ आणि सखोल तपासानंतर तयार करण्यात आलेल्या या आरोपपत्रात तोंडी साक्षी, कागदपत्रे, फॉरेन्सिक अहवाल, बॅलेस्टिक पुरावे, वैद्यकीय नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे यांचा समावेश आहे. तपास यंत्रणेने गेल्या अनेक दशकांतील सर्व उपलब्ध पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण करून हे आरोपपत्र तयार केले आहे.

हे ही वाचा:

“आमचे राजकारण तोडण्यासाठी नव्हे, तर जोडण्यासाठी”

सोन्याची चमक फिकी, चांदीचीही मोठी घसरण!

आयुष मलिक बनला होता मोहम्मद अली; स्वेच्छेने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला

हर्ष राऊतला रिले शर्यतीत कांस्य पदक

३५ वर्षांनंतर न्यायाच्या दिशेने मोठे पाऊल

तब्बल ३५ वर्षांनंतर आरोपपत्र दाखल होणे, दहशतवादग्रस्त पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील जुन्या दहशतवादी गुन्ह्यांच्या तपासातील हे सर्वात महत्त्वाच्या यशांपैकी एक मानले जात आहे.

काय घडले होते?

१८ एप्रिल १९९० रोजी, श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SKIMS) परिसरातून सरला भट यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अमानुष छळ आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले आणि श्रीनगरमधील मालबाग येथील ओमर कॉलनीत स्वयंचलित रायफलने गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

भीतीमुळे अनेक वर्षे तपास रखडला

दहशतवादाच्या शिखर काळात जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या भीती आणि दहशतीच्या वातावरणामुळे अनेक साक्षीदार पुढे येऊ शकले नाहीत. दहशतवादी संघटनांच्या धमक्यांमुळे अनेक गंभीर गुन्हे वर्षानुवर्षे दडपून राहिले. सरला भट हत्या प्रकरण हे काश्मीरमधील त्या काळातील दहशतवादाच्या काळ्या अध्यायाचे प्रतीक बनले होते.

नव्या तपासात महत्त्वाचे पुरावे

एसआयएने २०२४ मध्ये तपास हाती घेतल्यानंतर, संरक्षित साक्षीदारांचे जबाब, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, फॉरेन्सिक आणि बॅलेस्टिक विश्लेषण, वैद्यकीय पुरावे, दस्तऐवजीकरण, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि व्यापक क्षेत्रीय तपास यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्बांधणी करण्यात आली.

जेकेएलएफच्या मोठ्या कटाचा भाग

तपासात असे निष्पन्न झाले की सरला भट यांची हत्या ही केवळ स्वतंत्र हिंसक घटना नव्हती, तर जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या नेतृत्वाखाली रचलेल्या मोठ्या दहशतवादी कटाचा भाग होती. तपासात गोळा करण्यात आलेल्या पुराव्यानुसार, निरपराध नागरिकांमध्ये, विशेषतः काश्मिरी पंडित समाजात भीती निर्माण करणे, त्यांना काश्मीर खोऱ्यातून पलायन करण्यास भाग पाडणे आणि फुटीरतावादी अजेंडा पुढे नेणे हा या हत्येमागील उद्देश होता.

कोणत्या कलमांखाली गुन्हे दाखल?

आरोपपत्रात आरोपींवर खालील कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३६४ (अपहरण), ३४१ (बेकायदेशीर अडथळा), ३०२ (खून), ३४ (सामूहिक हेतू), २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि १२०-ब (कट रचणे). दहशतवादी आणि विध्वंसक कृत्ये (प्रतिबंध) कायदा, १९८७ (TADA) मधील कलम ३(२), ३(३), ४ आणि ६. भारतीय शस्त्रास्त्र कायदा, १९५९ मधील कलम ७ आणि २७. एसआयएने स्पष्ट केले आहे की काळ लोटला म्हणून गुन्हेगारांची जबाबदारी संपत नाही, आणि या तपासातून दहशतवादाच्या बळींना न्याय मिळवून देण्याचा सरकारचा निर्धार पुन्हा अधोरेखित झाला आहे.

Exit mobile version