अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार माजला. तालुक्यातील माधान गावातील मुख्य रस्ता नदीसारखा ओसंडून वाहू लागला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.गावातील लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी उंच घरांच्या स्लॅबवर आसरा घेतला आहे. पाण्यात भिजल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले.तब्बल दोन बरसलेल्या या पावसामुळे शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर कपाशी, सोयाबीन, तूर यासारख्या पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

गेल्या सहा दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अचानक झालेल्या या ढगफुटीमुळे शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील सोयाबीन, तूर यांसह अनेक पिके पाण्याखाली गेली असून मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.पूरसदृश परिस्थितीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी शासनाकडे तात्काळ मदत, बचावकार्य आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत मदतकार्य सुरू केले आहे.







