महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या ‘मॅच फिक्सिंग’ केल्याच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला. ‘ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आप आईना साफ करते रहे’. लेखाचे उत्तर लेखानेच दिले आहे. त्यामुळे आता तरी राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्ये करणे थांबवतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींच्या प्रत्येक आक्षेपाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. राहुल गांधींचे हे आहेत आक्षेप: १) मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केंद्राच्या बाजूने वळवणे: नवीन कायद्यानुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, आणि विरोधी पक्षनेते यांच्या समितीकडून निवडणूक आयुक्तांची निवड होते. यामध्ये भारताचे सरन्यायाधीश यांना वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी गंभीर आक्षेप घेतला.
२) बोगस मतदारांची भर, मतदार यादीत लाखो बनावट नावे घातल्याचा आरोप. ३) मतदानानंतर ७.८३ टक्क्यांनी वाढलेला टर्नआउट: हे तब्बल ७६ लाखांचे अतिरिक्त मतदान असून, राहुल गांधींनी यावर प्रश्न उपस्थित केला. ४) फक्त भाजपला विजय हवा तिथेच ‘बोगस मतदान’: भाजपने विशिष्ट मतदारसंघांमध्ये मतदान फसवणूक केल्याचा आरोप. ५) पुरावे लपविणे : या सगळ्या प्रक्रियेचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला. दरम्यान, राहुल गांधींच्या या आक्षेपावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले.
मुद्दा पहिला : १९५० पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आतापर्यंतच्या २६ पैकी २५ आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले. पहिल्यांदा मोदीजींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. पण, लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही.
दुसरा टप्पा : मतदारवाढीचा
विधानसभा निवडणुकीत ४०,८१,२२९ मतदारांपैकी २६,४६,६०८ मतदार हे युवा मतदार होते. नवीन मतदारांची नोंदणी, त्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग, त्यावरील सुनावणीची पद्धत याबाबत निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या पक्षाच्या विधी, मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर ६० पानांचे पत्र पाठविले आहे, त्यात सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचले नसेल तर एकदा मागवून आवर्जून वाचावे. यावेळी त्यांनी जुनी आकडेवारी दिली. २०१४ ते २०१९ या काळात : ६३ लाख नवीन मतदार वाढले.
२००९ ते २०१४ या काळात ७५ लाख नवीन मतदार वाढले. २००४ ते २००९ या काळात १ कोटी नवीन मतदार
म्हणजे २०२४ ला ४१ लाख म्हणजे वेगळे काही झालेले नाही.
यावेळी लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले ही आकडेवारी सुद्धा त्यांनी दिली.
२००४ : लोकसभेपेक्षा विधानसभेत ५ टक्के अधिक, २००९ मध्ये ४ टक्के अधिक, २०१४ मध्ये ३ टक्के अधिक,
२०१९ मध्ये १ टक्का अधिक, २०२४ मध्ये ४ टक्के अधिक आहे. त्यामुळे पुन्हा २०२४ मध्ये काहीही नवीन घडले असे नाही.
हे ही वाचा :
कोको गॉफ बनली फ्रेंच ओपन विजेती
“नवा युग, नवा कर्णधार, नवे स्वप्न!”
सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ
आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांसाठी ठरतोय वरदान
तिसरा टप्पा : अधिक मतदानाचा
दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी ५.८३ टक्के इतके मतदान झाले. त्यामुळे शेवटच्या १ तासात ७.८३ टक्के इतकी वाढ झाली आहे, मग यामध्ये विशेष काय?. सायं. ५ ते ६ ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि ६ पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो, ही बाब राहुल गांधी तुम्हाला माहिती नाही का?. २०२४ च्या लोकसभेच्या दुसर्या टप्प्यात सायं. ५ वाजता ६०.९६ टक्के इतके मतदान झाले. दुसर्या दिवशी ६६.७१ टक्के इतके मतदान होते. यातील वाढ ५.७५ टक्के इतकी होती. पण, ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपवून ठेवणार का?
चौथा टप्पा : अर्धवटपणाचा
यात राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, केवळ ८५ मतदारसंघात १२ हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात गेल्या. सायंकाळी ६ नंतर झालेले मतदान हे १७ लाख ७० हजार ८६७ इतके आहे. दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार, १ लाख ४२७ मतदानकेंद्रावर प्रतिमिनिट ९७,१०३.३२ इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जे मतदान सायं. ६ नंतर झाले आहे, त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ १८ मिनिटे २३ सेकंंद इतका होता. ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदार टक्केवारीत वाढ झाली तेथे एनडीएच जिंकली, हे तर आणखी हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात १८ टक्के वाढ जेथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला, वणीत १३ टक्के वाढ जेथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला, श्रीरामपूर येथे १२ टक्के वाढ जेथे काँग्रेस जिंकली.
पाचवा: अर्थहीन मुद्दा
राहुल गांधी यांनी निवडणुक आयोगासंबंधी काही पुराव्यांचे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यावर निवडणूक आयोग उत्तर देईलच. पण, मुख्य प्रश्न आहे तो सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करण्याचा, सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचा. जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे. सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करून आपण देशाला कोणत्या दिशेने घेवून जात आहोत, कोणते विष कालवत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण सातत्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा, सामान्यजनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणर असाल तर राज्यातील जनता माफ करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सेवक म्हणून मी कायम निषेधच करीन, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
