मंगळवारी भारत लिजंड्स आणि इंग्लंड लिजंड्स यांच्यात अटीतटीचा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाला. रस्ता सुरक्षा क्रिकेट मालिकेत सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वातील भारत लिजंड्स आणि केविन पीटरसनच्या नेतृत्वातील इंग्लंड लिजंड्स संघ एकमेकांना भिडले. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने ६ धावांनी विजय मिळवला.
भारत लिजंड्स विरुद्ध इंग्लंड लिजंड्सच्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंड कडून कर्णधार पीटरसन याने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ३७ चेंडूत ७५ धाव केल्या ज्यात ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. पीटरसनच्या या खेळीच्या जीवावर इंग्लंड लिजंड्स संघाने २० षटकांत ७ बाद १८८ एवढी धावसंख्या उभारत भारतासमोर १८९ धावांचे आव्हान ठेवले.
हे ही वाचा:
या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरवात वाईट झाली. इंग्लंडचा गोलंदाज माँटी पानेसर याच्या फिरकीसमोर भारताचे प्रमुख खेळाडू गारद झाले. भारतासाठी हा सामना प्रत्येक टप्प्यावरच कठीण होत चालला होता. पण अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि गोलंदाज मनप्रीत गोनी यांनी भारतीय संघाला विजयाची आशा दाखवली. आठव्या विकेटसाठी त्यांनी २६ चेंडूत ६३ धावांची भागीदारी रचली. पठाणने ४ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ३४ चेंडूत ६१ धावा केल्या. तर गोनीने १६ चेंडूत ३५ धावा केल्या ज्यात ४ षटकार आणि १ चौकार आहेत.
या दोघांनी अंतिम चेंडू पर्यंत झुंज देत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यशाला गवसणी घालता आली नाही.