लंडनमधील मराठीजनांना स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश आज (३ सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथिगृह येथे सुपूर्द करण्यात आला.
महाराष्ट्र मंडळ, लंडनच्यावतीने ट्रस्टी वैभव खांडगे यांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच विशेष प्रयत्न करून हा निधी मंजूर करून देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. लंडनमधील मराठी बांधवांसाठी स्वतःचे सांस्कृतिक भवन असावे, ही आमची दीर्घकाळची मागणी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे आज हा ऐतिहासिक क्षण साकारला आहे असे वैभव खांडगे म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, वनमंत्री गणेश नाईक, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.
हे ही वाचा :
फरारी मेनपाल ढिल्लाला कंबोडियातून आणले
CAA मध्ये अंतिम तारीख वाढवली, पाक-बांगलादेशातून येणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंना मोठा दिलासा!
राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्या सांगण्यावरून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली
व्हाईट-कॉलर नोकऱ्यांमध्ये तीन टक्क्यांची वाढ
दरम्यान, महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील सर्वात जुनी मराठी संस्था असून तिची स्थापना १९३२ मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी केली होती. स्थापनेपासून भाडेतत्त्वावर कार्यरत असलेल्या या संस्थेला अखेर स्वतःचे भवन मिळणार आहे. ‘महाराष्ट्र भवन’ हे लंडनमधील मराठी बांधवांसाठी केवळ सांस्कृतिक केंद्रच ठरणार नसून महाराष्ट्र शासन व युनायटेड किंगडम यांच्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ करणारे व्यासपीठ ठरणार आहे.







