जून महिन्यात फारसा पाऊस कोसळला नसला तरी जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोर पकडला आहे. कोकणाला पावसाने झोडपले असून कोकणातील नद्या दुथडी भरून वाहात आहेत.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला असून नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. कुंडलिका, उल्हास, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळीला जवळपास स्पर्श केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाची दखल घेतली असून जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
कोकणातील चारही जिल्ह्यांना पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. सोमवारी दिवसभर पावसाने जोर धरला होता सायंकाळी मात्र थोडा जोर कमी झाला असला तरी नद्या मात्र ओसंडून वाहात आहेत. ठाण्यातही ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनांची नोंदही झाली आहे. पण त्यातून सुदैवाने कुठलेही संपत्तीचे नुकसान मात्र झालेले नाही.
हे ही वाचा:
‘मी आलो, पण यांना घेऊन आलो!’ फडणवीस यांनी लगावला टोला
शिवसेना वाचविण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही!
अशोक चव्हाण, वडेट्टीवार बहुमत चाचणीला पोहोचलेच नाहीत!
लहानातल्या लहान माणसाच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे!
पुढील काही तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, परभणी, रत्नागिरी, रायगड येथे मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढील पाच दिवस पावसाची अशीच स्थिती राहणार असून मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार आहे.
मुंबईतही पावसाने जोर पकडला. अनेक सखल भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. स्वाभाविकच रहदारीवर मोठा परिणाम झाला. पावसामुळे रहदारी संथगतीने सुरू होती त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रेल्वेगाड्याही संथ गतीने धावत होत्या. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेलाही पावसाचा फटका बसला. काहीठिकाणी पाणी जमा झाल्यामुळे रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम दिसून आला.