जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; १० मृत्यू, राजौरीत पूरस्थिती

डझनभर वाहने वाहून गेली

जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; १० मृत्यू, राजौरीत पूरस्थिती

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुराने मोठे नुकसान झाले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक भाग जलमय झाले असून डझनभर वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली किंवा पाण्याखाली गेली आहेत. पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. नुकसानाचा प्राथमिक आढावा घेण्याचे कामही सुरू आहे.

हवामान विभागाने २३ जुलैपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शनिवारी संध्याकाळपासून राजौरी जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसानंतर रात्री उशिरा जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले.

अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दारहाली, खांडली, सुक्तोह आणि जमोला या प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवर किंवा त्यापेक्षा वर वाहत असून अनेक सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दारहाली नदीने बेला कॉलनीजवळील पूर संरक्षण भिंत फोडली, त्यामुळे नवीन बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. या ठिकाणी उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.

हे ही वाचा:

बंडखोर खासदारांसाठी स्वतंत्र आसनांमुळे सर्वपक्षीय बैठकीत गोंधळ

कोटक महिंद्रा बँकेचा दमदार तिमाही निकाल; नफ्यात २२.६ टक्क्यांची झेप

एसआयआरमध्ये उघड झाले मालेगावचे धक्कादायक वास्तव

२० जुलैला उपोषण थांबणार! सुरू होणार संसदेतला गोंधळ

५० हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर

अब्दुल्ला ब्रिजजवळील झोपडपट्टी परिसराला सर्वाधिक फटका बसला. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने ५० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. तारिक ब्रिज परिसरातही पूरस्थिती निर्माण झाल्याने पोलिस आणि आपत्कालीन पथकांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी विशेष मोहीम राबवली.

प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आमची पथके प्रत्येक आपत्कालीन कॉलला प्रतिसाद देत आहेत. सध्या आमचे मुख्य उद्दिष्ट कोणतीही जीवितहानी होऊ न देणे हे आहे. मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असले तरी पाणी ओसरल्यानंतरच त्याचा संपूर्ण आढावा घेता येईल.”

पोलिसांनी संवेदनशील भागात गस्त वाढवली असून नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देत नियंत्रण कक्षही सुरू केले आहेत.

आमदारांनी पक्षाचा कार्यक्रम रद्द केला

राजौरीचे आमदार इफ्तिखार अहमद यांनी पक्षाचा जम्मूमधील आंदोलनाचा कार्यक्रम अर्धवट सोडून राजौरीत परत येत मदतकार्याची पाहणी केली. ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील नागरिकांसोबत उभे राहणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. या पुरामुळे सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून प्रभावित कुटुंबांना तातडीने मदत आणि पुनर्वसन देण्याची गरज आहे.”

मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

अचानक आलेल्या पुरामुळे राजौरीतील अनेक सखल भाग जलमय झाले असून घरे, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Exit mobile version