भारताने ५८ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (International Chemistry Olympiad – IChO 2026) मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक स्तरावर आपली वैज्ञानिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे १० ते १९ जुलैदरम्यान झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतीय संघातील चारही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत देशाला संयुक्तपणे जगातील अव्वल स्थान मिळवून दिले. भारतासोबत चीन, व्हिएतनाम आणि स्वतंत्र सहभागी म्हणून सहभागी झालेल्या रशियन स्पर्धकांच्या संघानेही संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला.
यंदाच्या ऑलिम्पियाडमध्ये ९३ देशांतील ३६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कठीण सैद्धांतिक आणि प्रयोगाधारित परीक्षांमधून भारतीय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चारही सुवर्णपदके आपल्या नावावर केली. ही भारताची आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.
हे ही वाचा:
केन-बेतवा प्रकल्पाविरोधातील आदिवासींचा लढा अखेर थांबला
सिंधूने घडवला इतिहास, जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू
‘विक्रम-१’ने लिहिला इतिहास; आता भारत सज्ज जागतिक स्पेस मार्केट जिंकण्यासाठी!
एसआयआरमध्ये उघड झाले मालेगावचे धक्कादायक वास्तव
सुवर्णपदक विजेत्यांमध्ये कबीर छिल्लर, हर्षित सिंगला, देबदत्ता पी. आणि आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे कबीर छिल्लरने यापूर्वी जेईई अॅडव्हान्स्ड २०२६ परीक्षेत अखिल भारतीय दुसरा क्रमांक मिळवला होता आणि त्याने जेईई मेनमध्ये १०० टक्के गुणही मिळवले होते.
भारतीय संघाची निवड आणि प्रशिक्षण होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBCSE-TIFR) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या यशामुळे विज्ञान क्षेत्रातील भारतीय विद्यार्थ्यांची क्षमता, दर्जेदार प्रशिक्षण व्यवस्था आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती बौद्धिक ताकद अधोरेखित झाली आहे. सलग विविध आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये मिळत असलेल्या उल्लेखनीय यशामुळे भारत विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात नवी उंची गाठत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
