भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात टॉसदरम्यान महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या प्रतिमेचे विशेष ‘सुवर्ण नाणे’ वापरले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माध्यमांच्या अहवालानुसार, बंगाल क्रिकेट संघटना (सीएबी) ने या कसोटी सामन्यासाठी खास सुवर्ण नाणे तयार केले आहे. या नाण्याच्या एका बाजूला महात्मा गांधी तर दुसऱ्या बाजूला नेल्सन मंडेला यांची प्रतिमा आहे. हे नाणे शांती, स्वातंत्र्य आणि अहिंसेच्या मूल्यांचे प्रतीक मानले जात आहे.
सीएबी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले की, “हे नाणे विशेषतः या मालिकेसाठी तयार करण्यात आले असून, त्याचा वापर टॉसदरम्यान करण्यात येईल.”
अहवालात असेही म्हटले आहे की, सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी सीएबीतर्फे ‘जगमोहन डालमिया स्मृती व्याख्यान’ आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे दोन्ही देशांच्या खेळाडूंच्या उपस्थितीत व्याख्यान देतील.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ रविवारी सायंकाळी कोलकात्यात पोहोचला आहे. या मालिकेत दीर्घ विश्रांतीनंतर परतलेला विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतही सहभागी झाला आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा उपकर्णधार असेल.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत ७ पैकी ४ सामने जिंकून ६१.९० टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने २ सामने गमावले असून १ सामना अनिर्णित राहिला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने २ पैकी १ सामना जिंकून ५०.०० टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आपले स्थान टिकवले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने प्रारंभीचे ३ कसोटी सामने जिंकत अव्वल स्थान मिळवले आहे, तर श्रीलंका संघाने २ पैकी १ सामना जिंकून दुसऱ्या स्थानावर आपली जागा मजबूत केली आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळतील.







