अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच देशातील तरुणांमध्ये वाढणाऱ्या धार्मिक कट्टरतेबद्दल चिंता व्यक्त केली असून, याला एक चिंताजनक प्रवृत्ती म्हटले आहे. अलिना उर्फ अलिना परवीन आणि शाबिया या दोन मुस्लिम मुलींनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या रिट याचिकांच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या या मुस्लिम मुलींविरुद्ध, त्यांच्या हिंदू मैत्रिणीवर आपली धार्मिक श्रद्धा लादल्याबद्दल, उत्तर प्रदेश धर्मांतर प्रतिबंधक कायदा, २०२१ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता.
न्यायमूर्ती जे. जे. मुनीर आणि न्यायमूर्ती तरुण सक्सेना यांच्या खंडपीठाने मुस्लिम मुलींनी दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली. त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होत असल्याचे सांगून खंडपीठाने तपासात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. “तरुण लोकांमध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती दिसून येत असेल, तर ते अधिकच चिंताजनक आहे. त्यांच्या आयुष्यातील हा असा काळ आहे, जेव्हा त्यांनी शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपली कौशल्ये विकसित करण्यावर आणि स्वतःला समाज व राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित करण्यावर अधिक विचार करायला हवा,” असे याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले.
उच्च न्यायालयाने, १६ एप्रिल २०२६ रोजीच्या आपल्या आदेशात, लोकांकडून इतरांवर आपली धार्मिक श्रद्धा लादण्याच्या वाढत्या प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेश धर्माच्या बेकायदेशीर धर्मांतरावर प्रतिबंध कायदा, २०२१ चे महत्त्व स्पष्ट केले. “आपण या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे की, २०२१ चा कायदा समाजातील एका अशा गंभीर परिस्थितीला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आला होता, जिथे काही व्यक्ती स्वतःच्या धर्माचे पालन किंवा प्रचार न करता, तो इतरांवर लादतात; कारण त्यांच्या मनात असा समज निर्माण होतो की, त्यांनी मानलेला धर्म इतरांनीही पाळलाच पाहिजे,” असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
धार्मिक दबाव आणि सक्तीच्या धर्मांतराच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा कायदा काळाची गरज कशी होती, यावर उच्च न्यायालयाने प्रकाश टाकला. “देशभरात सध्या विविध स्तरांवरून ऐकू येत असलेल्या या उदयोन्मुख उपद्रवाला आळा घालण्यासाठी २०२१ चा कायदा आणण्यात आला होता, आणि याची आपण न्यायालयीन दखल घेतलीच पाहिजे. एखाद्या उदयोन्मुख उपद्रवाला आळा घालण्यासाठी तयार केलेला कायदा, जर त्याच्या अंमलबजावणीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच थांबवला गेला, तर तो कायदा अडकून पडेल आणि त्याचा उद्देश निष्फळ ठरेल,” असेही न्यायालयाने नमूद केले.
प्रकरण काय?
पीडितेच्या भावाने २२ जानेवारी २०२६ रोजी, मोरादाबाद येथील बिलारी पोलीस ठाण्यात, २०२१ कायद्याच्या कलम ३ आणि ५(१) अंतर्गत एफआयआर दाखल केला. एफआयआरमध्ये, पीडितेच्या भावाने म्हटले आहे की, मुस्लिम मुली त्याची बहीण कुमारी महिमा हिच्यासोबत मोरादाबादमधील बिलाई टाऊन येथील शाहूकुंज कॉलनीमधील एका कोचिंग सेंटरमध्ये शिकत होत्या. त्याने मुस्लिम मुलींवर आरोप केला की, त्यांनी त्याची बहीण कुमारी महिमा हिला जबरदस्तीने बुरखा घालायला लावला आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. आरोपींच्या या कृत्यामागे एक मोठे षडयंत्र असू शकते, असा संशय त्याने व्यक्त केला आणि पोलिसांनी याचा तपास करावा, अशी विनंती केली.
आपल्यावरील आरोप फेटाळताना अलीना म्हणाली की, पीडितेच्या भावाने केलेला प्रेमाचा प्रस्ताव तिने कथितरित्या नाकारल्यामुळे सूडबुद्धीने तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तिने असाही आरोप केला की, पीडितेचा भाऊ तिचा पाठलाग करत असे आणि एकदा तर त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती.
पीडितेने, बीएनएसएसच्या कलम १८३ अन्वये न्यायिक दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या आपल्या जबाबात, २० जानेवारी २०२६ रोजी घडलेली संपूर्ण घटना कथन केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, कोचिंग क्लासनंतर तिची मैत्रीण अलीना आणि तिच्या चार मुस्लिम मैत्रिणी, म्हणजेच मालिशका, शबिया, रिमशा आणि झेहरा यांनी तिला नाश्ता करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये बोलावले. रेस्टॉरंटला जाण्यापूर्वी, अलीनाने तिच्यासोबत आणलेला बुरखा (ओढणी) घालण्यासाठी तिला जबरदस्ती केली. जेव्हा पीडितेने तो घालण्यास नकार दिला, तेव्हा त्या सर्व मुस्लिम मुलींनी तिला जबरदस्तीने बुरखा घालायला लावला आणि त्या रेस्टॉरंटच्या दिशेने निघाल्या. अलीनाने मनाई केल्यामुळे पीडितेने आपल्या आईला याबद्दल काहीही सांगितले नाही.
हे ही वाचा:
इंडोनेशियात चिनी हेरगिरी उपकरण सापडले; चीनच्या कुरघोड्या उघड
गोल टोपी नको, शाल चालेल! सम्राट चौधरींची कृती चर्चेत
अंतराळातील देखरेख वाढवण्यासाठी ईशान्येत रडार, लडाखमध्ये टेलिस्कोप!
पीडितेने सांगितले की, अलिनाने तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. अलिना आणि इतर चार मुली सतत सांगत होत्या की त्यांचा धर्म चांगला आहे. त्यांनी पीडितेला सांगितले की त्यांच्या धर्मात स्वातंत्र्य आहे आणि बुरखा घातल्यावर त्या कुठेही जाऊ शकतात. त्यांनी तिला कुराणबद्दलही काही गोष्टी सांगितल्या आणि संपूर्ण कुराण ४० दिवसांत वाचता येते असेही म्हटले. अलिना आणि त्या चार मुली अनेकदा मांसाहारी जेवण आणून तिला ते खाण्यासाठी जबरदस्ती करत असत. आरोपी मुलींनी पीडितेला वारंवार इस्लाम स्वीकारण्याचा आग्रह केला.
ज्या ठिकाणी मुस्लिम मुलींनी पीडितेला बुरखा घालायला लावला होता, त्या ठिकाणाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज उच्च न्यायालयाने तपासले. न्यायालयाने नमूद केले की, पीडितेच्या भावाने तिचा पाठलाग केल्याचा आणि तिला लग्नाची मागणी घातल्याचा आरोप अलीनाने केला असूनही, तिने त्याच्याविरुद्ध कोणतीही एफआयआर दाखल केली नाही.







