संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांच्या खासदारांना विधायक चर्चेचे आवाहन केले. “जिथे तथ्य आणि तर्क असतात, तिथे गोंधळाला जागा नसते. तर्क आणि तथ्य भक्कम असतील, तर शांतपणेही आपले मत प्रभावीपणे मांडता येते,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना देशाने विकासाची गती पकडली असून, संसदेतील सकारात्मक वातावरण त्या गतीला नवी ऊर्जा देऊ शकते. राष्ट्राची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “आपल्या संसदेत विविध पक्षांतील अनेक अनुभवी खासदार आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा देशाला तसेच संसदेला मोठा फायदा होऊ शकतो. संसद सुरळीत चालावी, अर्थपूर्ण चर्चा व्हावी आणि सर्वांनी एकत्र येऊन देशाला पुढे नेण्याचा संकल्प करावा, ही आजच्या काळाची गरज आहे.”
देशातील महत्त्वाकांक्षी युवा पिढीच्या अपेक्षांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, “देशातील तरुणांना भारताने सातत्याने प्रगती करावी, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्तीने प्रेरित असलेल्या प्रत्येक आवाजाला संसदेत योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे. त्या आवाजांनी देशाला दिशा द्यावी.”
संसदेतील चर्चेच्या पातळीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, “जिथे तथ्य आणि तर्क असतात, तिथे गोंधळाला जागा नसते. जर तुमचे तर्क आणि तथ्य मजबूत असतील, तर शांत चित्तानेही आपली भूमिका ठामपणे मांडता येते. त्यामुळे सभागृहातील चर्चा तथ्य आणि तर्कांवर आधारित असावी. प्रत्येक मताला संधी आणि प्रत्येक विचाराला सन्मान मिळणे, हीच संसदेची खरी भूमिका आहे.”
हे ही वाचा:
सॅलड खाल्लं आणि रुग्णालय गाठलं! अमेरिकेत लेट्यूसमुळे अतिसारचा उद्रेक
वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर अर्जेंटिनात हिंसाचार; चाहत्यांचा संताप अनावर
“मी ५६ वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाही” मोदींचा राहुल गांधींना टोला
दिल्लीत जंतर-मंतरवर पोलिसांचा लाठीमार
शेवटी पंतप्रधानांनी सर्व खासदारांना अधिवेशनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. लोकसभा अध्यक्षांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व खासदारांचे स्वागत केले असल्याचा उल्लेख करत, “मीदेखील त्यांच्या स्वागताच्या भावनेत माझा आवाज मिसळतो आणि सर्व सदस्यांना संसदेच्या कामकाजात सक्रियपणे सहभागी होण्याचे निमंत्रण देतो,” असे मोदी म्हणाले.







