दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या ‘चला संसद’ मोर्चादरम्यान सोमवारी मोठा तणाव निर्माण झाला. जंतर-मंतरवरून संसदेकडे निघालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शास्त्री भवन मेट्रो स्थानकाजवळ अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. काही ठिकाणी आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी कठोर कारवाई केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJP ने शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी, कथित पेपरफुट प्रकरणांवर कारवाई आणि विविध मागण्यांसाठी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत तो बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू असल्याने संसद परिसरात कोणत्याही मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगितले होते.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर, रेल भवन, शास्त्री भवन आणि संसद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF), अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्जही केला, तर शास्त्री भवनजवळ अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
सुरक्षेच्या कारणास्तव राजीव चौक, जनपथ, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि सेवा तीर्थ ही पाच दिल्ली मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली. या निर्णयामुळे शेकडो प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला, तर काही ठिकाणी बंद प्रवेशद्वारांमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
हे ही वाचा:
‘चला संसद’ मोर्चापूर्वी अभिजीत दिपकेंनी सोडले उपोषण
मानखुर्दमध्ये बेस्ट बस दुभाजकावर आदळली; पादचाऱ्याचा मृत्यू
ठाकरेंच्या दादरमधील आंदोलनाप्रकरणी तीन गुन्हे दाखल
“जिथे तथ्य, तर्क असतात, तिथे गोंधळाला जागा नसते”
दरम्यान, आंदोलनादरम्यान CJP चे अनेक कार्यकर्ते आणि नेते पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत चर्चेसाठी नेल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे काही नेतेही आंदोलनस्थळी पोहोचले असता त्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांची मागणी आणि कथित पेपरफुट प्रकरणांवर कठोर कारवाई या मागण्यांसाठी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचे स्पष्ट केले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले आहे.







